बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरुवात

तेजस वाघमारे
Sunday, 13 December 2020

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येतील.

राज्य शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून 15 डिसेंबर 2020 पासून 4 जानेवारी 2021 पर्यंत भरायची आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना 18 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना महाविद्यालयाच्या लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. बारावी परीक्षेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

हेही वाचा-  Mumbai local train update: आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक
 

नव्याने फॉर्म 17 भरणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक

नव्याने फॉर्म क्रमांक 17 द्वारे नोंदणी करणार्‍या खासगी विद्यार्थ्यांची 2021 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपर्ण निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अर्ज भरण्याच्या तारखा

नियमित विद्यार्थी - 15  डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021
व्यवसाय अभ्यासक्रमचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी - 5 ते 18 जानेवारी 2021

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra board exam 12th students Application fill forms from december 15


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra board exam 12th students Application fill forms from december 15