मोनो रेल कर्मचाऱ्यांना चणचण, पगार वेळेवर मिळेना; साप्ताहिक सुटी घेतल्यास पगारकपात 

मोनो रेल कर्मचाऱ्यांना चणचण, पगार वेळेवर मिळेना; साप्ताहिक सुटी घेतल्यास पगारकपात 
Updated on

 
मुंबई -: मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांना उधारी घेऊन घर चालवावे लागत आहे; पण कोरोनाने सर्वांचे धाबे दणाणले असल्याने आता उधारी देणे बंद झाल्याची व्यथा मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनी मांडली. यासह मागील तीन महिन्यांपासून साप्ताहिक सुटी घेतल्याने पगार कपात करत असल्याची माहिती मोनो रेलमधील कर्मचाऱ्यांनी दिली. 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)तर्फे चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या दरम्यान मोनो रेल चालविण्यात येत आहे; मात्र मोनो रेल चालविण्यामागे ज्यांचे हात आहेत, त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. परिणामी ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर घर चालते, त्याची महिन्याची आर्थिक गणिते जुळत नाहीत. काही कर्मचाऱ्यांच्या घरचे आजारी आहेत; मात्र हातात पैसे नसल्याने औषधोपचार घेता येत नाही. 

मोनो रेलमध्ये तिकीट खिडकीवर काम करणारे कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला पगार मिळण्याची मागणी आहे; मात्र पगार येण्यास सातत्याने विलंब होतो. वैद्यकीय विमा नसल्याने कोरोनाची लागण झाल्यास कुठून पैसे उभे करणार, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना पडला आहे. 
घरातील परिस्थिती हलाखीची आहे. आईवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत; मात्र पगार वेळेवर नाही. साप्ताहिक सुटीचे पैसे कापून दिले जातात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर महिला कर्मचाऱ्याने दिली. 
मोनो रेलमध्ये काम करताना अनेक अडचणी येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून पगार देण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांना दुसरी पाळी दिली जाते. तसेच मुद्दामहून त्यांना त्यांच्या घरापासून लांबच्या मोनो स्थानकावर काम दिले जाते. सुरक्षारक्षक, तिकीट कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काम करा, अन्यथा राजीनामा द्या, असे सांगण्यात येत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांनी दिली. मागील सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत साप्ताहिक सुटीचे कापण्यात आलेले पैसे पुढील महिन्यात देण्यात यावे, अशी मागणी एका कर्मचाऱ्याने केली. 

कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! 
दरम्यान, सीआयएसबी नावाची थर्ड पार्टी आहे. त्यांच्याकडून मागील महिन्याचा पगार अवेळी करण्यात आला; मात्र या पगाराला एक किंवा दोन दिवस मागे-पुढे झाले. तरीही काही त्रुटी असल्यास सोडविण्यात येतील; परंतु कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कामगार कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांना सुटी दिली जात आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. 

Mono rail employees do not get their salaries on time Salary deduction for taking weekly leave

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com