ही पाहा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

मंत्रिपदांसाठी भाजपमध्ये खलबतं  | कुणाची लागणार वर्णी ? | कुणाचा होणार पत्ता कट ? 

सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेसोबत भाजपच्या कुरबुरी सुरु असतानाच आता भाजपनं मात्र आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करायला सुरुवात केलीय. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी भाजपात आलेल्या दिग्गज आयारामांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते. 

  1. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची नावं निश्चित मानली जातायत. 
  2. अखेरच्या तीन महिन्यात झालेल्या विस्तारात समावेश झालेले डॉ. संजय कुटे, सुरेश खाडे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल सावे यांचीही मंत्रिपदं कायम राहण्याची चर्चा आहे. 
  3. औरंगाबादमधून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद कायम राहण्याचीच शक्यता जास्त आहे. 
  4. निवडणुकीच्या आधी काहीच महिने काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रिमंडळात वर्णी निश्चित मानली जातेय. मात्र, असं असलं तरी राम शिंदे आणि नगर जिल्ह्यातल्या पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांनी विखे पाटलांना विरोध केल्याची चर्चा आहे. 
  5. विखे पाटलांप्रमाणेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. उस्मानाबादमध्ये पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी राणा जगजितसिंह यांचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळू शकतं. 
  6. तर लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू असलेले अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्यानंतरही निलंगेकर यांनी त्यांना मदत केली नाही. त्यांच्या गटानं विरोधात काम केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर फुली मारली जाऊ शकते, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.
  7. ठाणे जिल्ह्यातून माजी मंत्री गणेश नाईक, विद्यमान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची नावं आघाडीवर आहेत. कथोरे हे भाजपमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांची ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर पकड आहे. तर गणेश नाईक हे नवी मुंबईतले मातब्बर नेते मानले जातात.
  8. भाजपला स्वपक्षीयांप्रमाणेच घटक पक्षातल्या काही नेत्यांनाही संधी द्यावी लागणार आहे. आधीच्या सरकारमध्ये घटक पक्षाच्या महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि अविनाश महातेकर यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळे अखेरपर्यंत मंत्रिपद मिळालं नव्हतं. यावेळी मात्र मेटेंना संधी मिळू शकते.

शिवसेनेला किती मंत्रिपदं सोडावी लागतात हे पाहून भाजप मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणार आहे. एकाचवेळी सर्व मंत्रिपदं भरण्यात येणार नसून आधी ठराविक मंत्र्यांचा शपथविधी होईल. मंत्रिमंडळ विस्तारात अन्य नेत्यांना संधी मिळेल, असं बोललं जातंय. 

Webtitle :  these are potential candidates for various cabinet ministries offered by bjp  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: potential candidates for various cabinet ministries offered by bjp