esakal | सोनिया गांधी-शरद पवार यांची बैठक ठरली; कधी? कोठे होणार बैठक?
sakal

बोलून बातमी शोधा

sonia gandhi sharad pawar to meet in delhi tomorrow maharashtra government

सोनिया गांधी-शरद पवार यांची बैठक ठरली; कधी? कोठे होणार बैठक?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. 17) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे. उद्या पुण्यातील राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर शरद पवार दिल्लीला रवाना होणार आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाशिवआघाडीचे दिल्लीत पडसाद; शिवसेना सदस्यांच्या जागा बदलल्या

शरद पवार दिल्लीला जाणार
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर दोन आठवडे राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून, या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. या चर्चेतून किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यावर अंतिम टप्प्यातील चर्चा होणार आहे. उद्या पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर दुपारी शरद पवार दिल्लीला रवाना होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

स्थानिक निवडणुकांमध्येही एकत्र येऊ शकतो; काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य

यूपीएची महत्त्वाची बैठक
सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल मुंबईत आले होते. त्यांनी पवार यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून शिवसेनेसोबत पुढील चर्चा करण्याचे सूचित केले होते. आता उद्या शरद पवार दिल्लीत दाखल होणार आहेत. सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्वी संध्येला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांतील नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. 

पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
दिल्ली येथे जाण्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (ता. 17) पुण्यात आयोजित केली आहे. राज्यातील सत्ता स्थापन करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करून त्यानंतर पवार दिल्लीसाठी रवाना होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सांगण्यात आले.