राष्ट्रवादीचा शाेर, भाजपला घाेर ; उदयनराजे पिछाडीवरच I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे काही फेऱ्यांत स्पष्ट झाले आहे.

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आठव्या फेरीअखेर झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 81 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजपने उमेदवार आयात करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यातूनच शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झाले. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनीही भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रसचे उमेदवार होते. त्यांना पाडण्यासाठी भाजपने जोरदार ताकद लावली होती. त्यासाठी त्यांच्या पक्षात असलेल्या नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत पाठवून उमेदवारी मिळवून दिली होती; परंतु संपूर्ण निवडणूकही भाजपच्याच टीमने हातात घेतली होती. या वेळी उदयनराजेंवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यातून हा सामना अटीतटीचा झाला होता. उदयनराजे भोसले हे सव्वा लाख मतांनी निवडून आले.

त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रसेचे सर्व आमदार व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. 
राष्ट्रवादी कॉंग्रसेचे आमदार व कार्यकर्त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत उदयनराजेंनी अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभेबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारच्या मैदानात प्रचारासाठी उतरवले; परंतु उदयनराजेंनी पक्षाशी व मतदारांशी केलेली प्रतारणा राष्ट्रवादी जणांना रुचली नव्हती. उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशापासूनच मतदार संघात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर दिसत होता. त्यामुळे मोदींच्या प्रचारसभेचाही मतदारांवर फारसा परिणाम झालेला मतमोजणीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली होती. आठव्या फेरीअखेर त्यांनी उदयनराजेंना 81 हजार मतांनी पिछाडीवर टाकले होते.  

विधानसभेतही राष्ट्रवादीची आघाडी 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पहिल्या काही फेऱ्यांत स्पष्ट झाले होते. फलटणमधून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण , वाईतून मकरंद पाटील, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, कऱ्हाड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांनी आघाडी घेतली होती. कऱ्हाड दक्षिणमधून कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते. महायुतीचे तीन उमेदवार आघाडीवर होते. त्यात साताऱ्यातून भाजपचे शिंवेंद्रसिंहराजे भोसले. माणमधून जयकुमार गोरे, तर पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई आघाडीवर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends early morning