साताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी उतरवणार तगडा उमेदवार!

टीम ई-सकाळ
Saturday, 14 September 2019

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पण, उदयनराजे भोसले यांचा विशेष करिष्मा असलेल्या या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.

नवी दिल्ली : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पण, उदयनराजे भोसले यांचा विशेष करिष्मा असलेल्या या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.

आणखी वाचा : Video : राष्ट्रवादीत 15 वर्षांत फक्त अडवा आणि जिरवा : उदयनराजे

राष्ट्रवादी साताऱ्यावर सोडणार पाणी?
आज, सकाळीच उदयनराजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर लगेचच काँग्रेस-राष्ट्रवादीने सातारा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उदयनराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याविषयी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी उदयनराजे यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्याची माहिती आहे. मुळात साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तेथे काँग्रेस उमेदवारी कशी देणार? असाही प्रशन उपस्थित होत आहे. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये या विषयावरही चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्याच्या जागेवर पाणीसोडण्यात तयार असल्याचीही माहिती आहे.

आणखी वाचा : उदयनराजे भाजपमध्ये; फायदा कोणाचा? तोटा कोणाचा?

साताऱ्यात लागणार पोटनिवडणूक
उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना, राष्ट्रवादीसाठी ही जागा एकतर्फी विजयाची होती. त्यावेळी उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी शिवसेना-भाजपला उमेदवार सापडायचा नाही आणि परिणामी साताऱ्याची जागा आपसूकच राष्ट्रवादीच्या खिशात जायची. आता, उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपचे कमळ हातात घेतल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना आधी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागणार हे निश्चित आहे. पण, उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न राष्ट्रवादीपुढे आहे.

आणखी वाचा : साताऱ्यात दोन राजांची ताकद विभागणार, पण कशी?

आणखी वाचा : उदयनराजे, 15 वर्षांत झालेला त्रास कधी आम्हाला सांगितला का नाही? : सुळे

दिल्ली केला पक्षप्रवेश
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मध्यरात्री उठवून उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज सकाळी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रामदास आठवले, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje bhosale joins bjp satara by election congress ncp candidate prithviraj chavan