esakal | समर्पित आणि व्रतस्थ जीवन : राजारामबापू पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

rajarambapu patil

माझ्या पूर्ण राजकिय प्रवासात त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकलो नाही किंवा मी करत असलेल्या कार्याने त्यांच्या ध्येयपूर्तीचे समाधान प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे माझं सर्वात मोठं दुःख आहे.

समर्पित आणि व्रतस्थ जीवन : राजारामबापू पाटील 

sakal_logo
By
जयंत पाटील

राजारामबापू यांचा जन्म १९२० साली वडगाव-हवेली येथे झाला. शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. माझे आजोबा अनंत दादा आणि त्यांचे भाऊ ज्ञानू बुवा हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. ते दोघेही गांधीजींचे अनुयायी होते. त्यामुळे लहानपणापासूनच बापूंवर देशसेवेचे संस्कार झाले. कोल्हापुरात 'लॉ'चे शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. याच काळात त्यांच्या विचारसरणी घडत गेली. गांधीजींकडून प्रेरित होऊन त्यांनी खादीचा पुरस्कार केला आणि परदेशी मालाचा त्याग करत त्याकाळी ‘आत्मनिर्भरते’चे पाऊल उचलले. शिक्षण आणि देशसेवा असा समांतर प्रवास त्यांनी सुरू केला. 

वाळवा तालुक्यात शिक्षणाच्या योग्य संधी अभावी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे, बडोदा, कोल्हापूर येथे आपल्या शिक्षणाची शिदोरी भरत ते कासेगावचे पहिले वकील बनले. शिक्षणासाठी आपण घेतलेले कष्ट पुढच्या पिढीला सहन करायला लागू नये, या उदात्त हेतूने त्यांनी १९४५ साली ‘कासेगाव एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. अत्यंत कमी अवधीत या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विणले. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. साने गुरुजी हे दादांच्या अगदी जवळचे होते. दादा त्यांचा अत्यंत आदर करायचे. साने गुरुजी एकदा म्हणाले होते, ‘राजाराम महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा व्यक्ती ठरणार!’ 

१९५२ साली सांगली जिल्हा बोर्डचे अध्यक्ष झाल्यानंतर राजारामबापू यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. गांधीभक्त असल्याने त्यांनी भारतीय समाजाला विळखा घातलेल्या अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला, हरीजनांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष केला. सांगलीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी पुरोगामी आणि शास्त्रोक्त पद्धतीने कार्य सुरू ठेवले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे १९६२ साली ते पहिल्यांदा वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि पुढील २२ वर्षे त्यांनी निर्विवाद आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी सहकार क्षेत्राचे महत्व जाणले. विरोधाला न जुमानता त्यांनी अवघ्या १४ महिन्यांत वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. आज वाळवा व इस्लामपूर भागात जे सहकारी संस्थांचे जाळे आहे ते त्यांच्या मेहनतीचं फलित आहे. सलग १२ वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळलेल्या राजारामबापू यांनी त्यांच्या कारकिर्देत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी महसूल मंत्रिपद स्वीकारले, तेव्हा महाराष्ट्र राज्यातील तीन भागात, तीन वेगळ्या करपद्धती लागू होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन राज्यभर एकसमान करपद्धत लागू केली. त्याचीच आवृत्ती म्हणजे आजचे ‘वन नेशन, वन टॅक्स पॉलिसी’. त्यांनी विविध खात्यांद्वारे विकास योजना राबविल्या. १९६६ साली महसूल मंत्री असताना त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे खाते पुस्तक बनविण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. आयुष्यभर त्यांनी विविध पदं भूषविली, मात्र शिक्षणावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

दादांचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच भावला. १९७० च्या सुरुवातीपर्यंत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दादा एसटी बसने प्रवास करायचे. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी बोरगावात भाषण केले होते. त्यात त्यांनी ग्वाही दिली होती की वाळवा आणि इस्लामपूर तालुक्याला पाण्यापासून वंचित राहू देणार नाही. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या मृत्यूनंतर मी माझ्यावर घेतली आहे. आणि या स्वप्नपूर्तीचे पूर्ण श्रेय त्यांनाच जाणार, पाणीदार वाळवा आणि इस्लामपूरचे ध्येय त्यांनी माझ्या मनात बिंबवले आहे. बापूंनी कार्यकर्त्यांसोबत आयुष्यभरासाठी जोडलेले नाते, विश्वास, एकमेकांसाठीचा आदर मी स्वतः अनुभवला आहे. आज भारतीय लोकशाहीच्या मूळ गाभ्याला धक्का बसत आहे, सत्ताकेंद्री वृत्ती सर्रास पहायला मिळते आहे, अशा वेळी दादांनी आयुष्यभर स्वीकारलेली मूल्ये मला समाजसेवेची प्रेरणा देत राहतात. चंद्रशेखर यांच्यासह कोल्हापूरच्या कागलपासून धुळ्यापर्यंत दादांनी केलेली ११०० किलोमीटरची पदयात्रा माझ्यासाठी धगधगती मशाल आहे. ही मशाल मला सतत महाराष्ट्रातील लोकांसोबत असलेल्या ऋणानुबंधाची, त्यांच्याप्रती असलेल्या माझ्या कर्तव्याची जाणीव करून देते. 

मी फक्त २१ वर्षांचा होतो, जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले. मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू शकलो नाही. माझ्या पूर्ण राजकिय प्रवासात त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकलो नाही किंवा मी करत असलेल्या कार्याने त्यांच्या ध्येयपूर्तीचे समाधान प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे माझं सर्वात मोठं दुःख आहे. जरी मला त्यांच्यासोबत काम करता आले नसले तरी त्यांनी आखून दिलेली नैतिक तत्वे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला जगण्याचा मार्ग दाखवत आहे. दादांच्या आठवणींना, त्यांच्या महानतेला शब्दांत बांधणं मला कठीण जात आहे. ‘राजारामबापू यांचा मुलगा’ ही माझी ओळख माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा