राज्यात आता शिक्षणाची वारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

इगतपुरी (जि. नाशिक) - शैक्षणिक क्षेत्रात होणारे प्रयोग राज्यातील शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिक्षणाच्या वारीचे आयोजन केले असून, प्रत्येक जिल्ह्यातून 200 शिक्षक यात सहभागी होतील. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी ही वारी होणार आहे. 

इगतपुरी (जि. नाशिक) - शैक्षणिक क्षेत्रात होणारे प्रयोग राज्यातील शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिक्षणाच्या वारीचे आयोजन केले असून, प्रत्येक जिल्ह्यातून 200 शिक्षक यात सहभागी होतील. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी ही वारी होणार आहे. 

केंद्र सरकारच्या अनुदानाच्या आधारे राज्यात शिक्षणाच्या वारीचा प्रयोग सुरू करण्यात आला. गेल्या शैक्षणिक सत्रात पहिल्यांदा अशा वारीचे आयोजन करण्यात आले. त्यात राज्याच्या शिक्षण क्षेत्रात होणारे विविध प्रयोग शिक्षकांना दाखविले जातात. हे प्रयोग पाहून त्यांची अंमलबजावणी शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रात करावी, अशी अपेक्षा या वारीच्या आयोजनामागे आहे. गेल्या वर्षी पुणे येथे या वारीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक सत्रात पुण्यासह नागपूर आणि औरंगाबाद येथे ही वारी होईल. शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी या वारीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अंतर्गत ही वारी पार पाडली जाणार आहे. यात 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला पुणे येथे ही वारी होईल. 13, 14 आणि 15 डिसेंबरला नागपुरात; तर 25, 26 आणि 27 जानेवारीला औरंगाबाद येथे ही वारी आयोजित केली आहे.

मुंबईत होणाऱ्या वारीत मुंबई, पुणे आणि कोल्हापूर विभागातील दोन हजार 400 शिक्षक, नागपूर येथील वारीत अमरावती आणि नागपूर विभागातील दोन हजार 200 शिक्षक, तर औरंगाबादच्या वारीत औरंगाबाद, लातूर आणि नाशिक विभागातील दोन हजार 400 शिक्षकांचा सहभाग असेल. तिन्ही ठिकाणी मिळून सुमारे सात हजार शिक्षक शैक्षणिक प्रयोग समजून घेण्यासाठी एकत्र येतील. ज्या शिक्षकांना आपली शाळा किंवा वर्ग प्रगत करण्यात अडचणी येत आहेत अशा शिक्षकांना या वारीला पाठविले जाणार आहे. वारीत सहभागी होण्याचा खर्च स्थानिक शिक्षण विभागाकडून केला जाईल. सर्वशिक्षा अभियानाचा एक भाग म्हणून या वारीचे आयोजन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiments conducted in the field of education