Loksabha 2019 : मोदी चक्क पवार आणि राष्ट्रवादीवर शब्दही नाही बोलले

संपत देवगिरे
सोमवार, 22 एप्रिल 2019

- आज पिंपळगाव बसवंतच्या शरद पवार बाजार समितीच्या आवारात मोदींची सभा झाली. 
- सभेत ते शरद पवार यांच्यावर मोदींनी शब्दानेही टीका केली नाही.
- अगदी नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे उपस्थितांत तो चर्चेचा विषय

नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तीक अन्‌ राजकीय हल्ले चढवत होते. आज पिंपळगाव बसवंतच्या कृषीपंढरीत अन्‌ खुद्द शरद पवार बाजार समितीच्या आवारात मोदी यांची सभा झाली. मात्र, या सभेत ते शरद पवार यांच्यावर चकार शब्दानेही टीका केली नाही. अगदी नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे उपस्थितांत तो चर्चेचा विषय ठरला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी पिंपळगाव बसवंत येथील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा झाली. सभेला मोठी गर्दी होती. प्रथेप्रमाणे पुढे बसलेली मंडळी मोदी, मोदीचा घोषही करीत होती. पेन्शनर आंदोलन, कांदा उत्पादकांचा निषेध, शेतकऱ्यांचे संभाव्य आंदोलन, मैदानात निघणारे साप अशा विविध कारणांमुळे ही सभा चर्चेत होती. मात्र सर्वाधीक उत्सुकता होती ती द्राक्ष, डाळींब व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा व पवार यांना माननाऱ्या शेतकऱ्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील सभेत मोदी यांनी आपल्या संपुर्ण भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा, कांदा, द्राक्ष, बेरोजगारी, सर्जीकल स्ट्राईक, चौकीदार, कॉंग्रेस या सगळ्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी शरद पवारांवर टीका तर दूर त्यांचा नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे सभा चर्चेचा विषय ठरली. 

त्यांच्या भाषणातील मुद्दे, नाशिकचे सप्तरंगाशी जोडलेले नाते, कांदा, वांगेसट, शेतकरी आदींवर ते बोलले. त्यासाठी व्यासपीठावर आपण स्थानिक नेत्यांकडून संदर्भ घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे शरद पवार व शेतकरी आंदोलनाचा या भागाशी निकटचा संबंध असल्याचा 'फिडबॅक' त्यांना नक्कीच मिळाला असावा. कदाचीत त्यामुळेच त्यांनी शरद पवारांचा अनुल्लेख केला असावा असे बोलले जाते.

Web Title: Narendra Modi did not talk about Sharad Pawar and NCP in Todays Rally at Nashik