आगरतळाचे जिल्हाधिकारी संदीप महात्मेंचा गाव भाटवाडी 

residential photo
residential photo

नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधून आसामच्या हद्दीतील वीस किलोमीटरचा महामार्गाचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले. त्रिपुराला देशाशी जोडणारा हा एकमेव मार्ग वेळेत पूर्ण झाला. हे काम करणारे आणि पंतप्रधानांनी संपर्क साधलेले तत्कालिन उत्तर त्रिपुराचे जिल्हाधिकारी आणि आताचे आगरतळाचे जिल्हाधिकारी संदीप महात्मे हे होत. त्यांचे मूळ गाव तेराशे लोकवस्तीचे भाटवाडी (ता. सिन्नर). 
भाताचे अधिक उत्पादन घेतले जात असल्याने गावाची ओळख भाटवाडीने झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. देव नदीच्या तीरावर बसलेल्या गावात मारुती, खंडेराव, महालक्ष्मी, महादेवाचे मंदिर आहे. बारा गाड्या ओढण्याची शंभर वर्षापासूनची परंपरा ग्रामस्थांनी जोपासलीयं. बारा गाड्या ओढण्याचा मान गोपीनाथ पाचोरे यांना आहे. तसेच मारुती मंदिराचा यात्रोत्सव भरतो. गावातील मल्ल (कै.) पांडुरंग महात्मे, शंकर खडजे हे कुस्त्यांमध्ये पंचक्रोशित प्रसिद्ध होते. शंकर ढगे, भरत लोणारे या कलावंतांनी आपली कला जोपासली आहे. दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो. देवीचे गाणे म्हणणारे नारायण पाचोरे, शिवाजी पाचोरे, भीमा पाचोरे हे गायक याच गावचे. गावाला पिण्यासाठी पाणी यावर्षीपासून सरदवाडी धरणातून आणले आहे. दुष्काळी भागातील गावात पूर्वी देव नदीवरील विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. एक तरुण देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाला आहे. 
गावाजवळून सिन्नर-घोटी महामार्ग गेला आहे. गावात प्राथमिक शाळा असली, तरीही पुढील शिक्षणासाठी मुलांना सिन्नरचा रस्ता धरावा लागतो. ही गैरसोय दूर होण्यासाठी गावात दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय व्हायला हवी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ग्रामस्थांप्रमाणेच पशुधनाच्या आरोग्याची सेवा गावात उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. त्रिपुरामधील जिल्हाधिकारी महात्मे यांच्याविषयी ग्रामस्थांमध्ये आनंदभाव आहे. तरुण क्रीडाक्षेत्र गाजवत असल्याने गावात मैदान व्हावे अशी तरुणांची इच्छा आहे. तसेच स्वाध्याय केंद्र असून बालवाडी डिजीटल केली आहे. देव नदीवर जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. चेतन शिंदे या तरुणाने कुटुंबियांसमवेत मातीच्या बैलांच्या सुबक मूर्ती साकारल्यात. अक्षयतृतियेपासून या कामात शिंदे कुटुंब दंग झाले होते. पंचवीस प्रकारच्या वीस हजारांहून अधिक सर्जा-राजा त्यांनी तयार केलेत. 

आमचे गाव छोटे असले, तरी विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाणीपुरवठा योजनेमुळे यंदा पाण्याची अडचण भासली नाही. गावात कॉंक्रीटचे रस्ते केले आहेत. सिमेंट बंधारे बांधले आहेत.
-श्‍वेता पाचोरे (सरपंच) 
 

कलावंतांचे गाव म्हणून भाटवाडीकडे पाहिले जाते. आमच्या गावातील तरुण जिल्हाधिकारी झाले आहेत. त्याबद्दलचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्याकडे पाहून इतर तरुणांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर होण्यासाठी मार्गदर्शन मिळायला हवे. 
- मुरलीधर पाचोरे (ग्रामस्थ) 

गावात माध्यमिक शाळा नाही. दवाखाना नाही. पशुवैद्यकीय दवाखानाही नाही. खेळायला मैदान नाही. या प्राथमिक गरजा पूर्ण व्हायला हव्यात. 
- विकास महात्मे (ग्रामस्थ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com