जंगलचा राजा वाघाला नाव ठेवाल तर, खबरदार!

राजेश रामपूरकर 
Monday, 21 October 2019

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत.

नागपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे पालन न करणाऱ्या रिसॉर्ट, होम स्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकांवर निलंबनासह कायमस्वरूपी बंदीच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत. असा निर्णय घेणारे राज्यातील ताडोबा प्रकल्पाचे हे पहिलेच क्षेत्र संचालक आहेत.   

वाघाला नाव नसते, गावही नसते, तो जंगलाचा राजा असतो हीच त्याची खरी ओळख. मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्साही वन्यजीवप्रेमी, पर्यटक मार्गदर्शक, वनाधिकारी वाघांना नाव देऊन प्रसिद्धी मिळवणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया, गब्बर, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जय, बुट्टू, श्रीनिवास ही नावे चर्चेत आली होती. वाघाला नाव दिल्यास पर्यटकांचे विशिष्ट वाघाकडे अधिक लक्ष केंद्रित होते. प्रसंगी पर्यटन क्षेत्रातील वाघ प्रसिद्धी झोतात येतात. नैसर्गिक प्रक्रियेनुसार किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाघ मरण पावल्याचे त्यालाही प्रसिद्धी अधिक मिळते. अनेक पर्यटक संबंधित वाघाच्या नावाने सोशल मीडियावर छायाचित्र शेअर करतात. शिकाऱ्यांना वाघाचे ठिकाण कळत असल्याने ते त्यांचे लक्ष्यही होऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर वाघांच्या नावांचा उल्लेख केलेला असल्यास नोटिशीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या कालावधीत असा मजकूर हटविण्यात यावा. या नियमांचे पालन न केल्यास किमान १५ दिवस निलंबनापासून ते कायमस्वरूपी बंदीपर्यंत आवश्‍यकतेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने वाघांना नाव देण्यासंबंधी नियम केले आहे. त्यानुसार कोणत्याही वाघाला टी-१, टी-२ अशा प्रकारची नावे देणे अपेक्षित आहे. कोणीही वाघांना नावे देत असेल तर त्याचे पुरावे मिळाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Tadoba Adhari Tiger Reserve