Wari 2019 : आषाढी एकादशीसाठी 1200 नव्या बस 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 July 2019

आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नवीन 1200 बसगाड्या सज्ज झाल्या आहेत.

मुंबई - आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नवीन 1200 बसगाड्या सज्ज झाल्या आहेत. नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त तीन हजार 724 जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढपूरच्या वारीचे चित्रण केलेल्या बाराशे बसगाड्या प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. 

एसटी महामंडळाने माइल्ड स्टीलचा वापर करून बांधलेल्या या 1200 बसगाड्या राज्यातील 250 आगारांमधून धावणार आहेत. या बसगाड्यांवर पंढरपूर यात्रेचे चित्रण करण्यात आले आहे. मजबूत बांधणी आणि आरामदायक आसनव्यवस्था ही या बसगाड्यांची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले. प्रवासादरम्यान बसमध्ये बिघाड झाल्यास पंढरपूर मार्गावर दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवास सुखद होईल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

एसटी महामंडळातील सुमारे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर यात्रेसाठी 10 ते 16 जुलैपर्यंत सेवा देणार आहेत. यात्रेच्या कालावधीत लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभागनिहाय तात्पुरत्या बस स्थानकांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकांत उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रे, शुद्ध पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरवण्यात येत असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1200 new buses for Ashadhi Ekadashi