wari 2019 : वारकऱ्यांच्या सोयीसाठी 29 हजार स्वच्छतागृहे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 July 2019

यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुंदर व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांबरोबरच स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी पंढरपूर शहरात विविध भागांत सुमारे 29 हजार स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

पंढरपूर -  यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुंदर व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांबरोबरच स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी पंढरपूर शहरात विविध भागांत सुमारे 29 हजार स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

शहरातील प्रमुख रस्ते, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरात वारीकाळात स्वच्छता राहावी, यासाठी पालिकेचे सुमारे 1 हजार 600 कर्मचारी स्वच्छतादूत म्हणून सेवा करणार आहेत. 

आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 10 ते 12 लाख भाविक पंढरीत येतील, अशी शक्‍यता गृहीत धरून प्रशासनाने स्वच्छतागृहांची सोय केली आहे. यासाठी शहरातील खासगी स्वच्छतागृहांचाही वापर केला जाणार आहे. दरवर्षी फॅब्रिकेटच्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांचा मोठा वापर केला जातो. मागील दोन वर्षांपासून शहरातील विविध भागांत पाच ते सहा ठिकाणी कायमस्वरूपी सुलभ शौचालये बांधण्यात आली आहेत. 

वारीकाळात सार्वजनिक व तात्पुरत्या स्वच्छतागृहांबरोबरच शहरातील खासगी स्वच्छतागृहांचाही वापर केला जाणार आहे. प्रशासनाने खासगी स्वच्छतागृहाच्या मालकांना तशा सूचनाही दिल्या आहेत. स्वच्छतागृहांवर पांढऱ्या रंगाने "स्वच्छतागृहाचा वापर करावा' अशी पाटी लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 thousand toilets for warkari