wari 2019 : पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

आषाढी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी येऊ लागले आहेत. सुमारे दोन लाख भाविक येथे दाखल झाले.

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी येऊ लागले आहेत. सुमारे दोन लाख भाविक येथे दाखल झाले असून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज 10 क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आज सुमारे 15 तासांचा वेळ लागत होता. 

आषाढी यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणच्या दिंड्या पंढरपूरच्या जवळ आल्या आहेत, तर काही दिंड्या पंढरपुरात पोचू लागल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी दिसू लागली आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले रमेश श्रीराम शेंडे (रा. बोडखा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) म्हणाले की, काल रात्री नऊ वाजता 10 क्रमांकाच्या पत्राशेडमध्ये दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. सुमारे 15 तासांनंतर आज दर्शन झाले. बेबीताई निवृत्ती गोजरे (रा. करंजवन, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या म्हणाल्या की, मंदिर समितीने दर्शन रांगेत चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. परंतु, पत्राशेड परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढवली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About two lakh devotees in pandharpur