wari 2019 : दर्याच्या मच्छीमारांची वैराग्याची वारी

शंकर टेमघरे
गुरुवार, 11 जुलै 2019

वाखरी (जि. सोलापूर) - पंढरीच्या वारीत सर्व क्षेत्रांतील आणि सर्व स्तरांतील वारकरी असतात. वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर पायी पार करतात. मच्छीमारांची ही दिंडी जणू वैराग्याची वारी करीत असते. आळंदीतील प्रस्थानानंतर सहा दिवसांनंतर निघालेल्या अर्नाळा कोळीवाडा मच्छीमार दिंडीने मजल दरमजल करीत वाखरीत माउलींचा पालखी सोहळा गाठला. 

पंढरीच्या आनंदवारीत आपणही सहभागी व्हावे, या उद्देशाने दादामहाराज जोशी यांच्या प्रेरणेने आणि मोरेश्वर वैती यांच्या नेतृत्वाखाली अर्नाळा कोळीवाडा मच्छीमार दिंडीने पंढरीच्या वारीस सुरवात केली. यंदा अर्नाळा वारकरी मंडळाच्या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या शंभर आहे. 

या सर्व मच्छीमारांच्या स्वतंत्र होड्या आहेत. एक जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळात समुद्रात मच्छीमारी करण्यास बंदी असते. त्या काळात जूनच्या पंधरवाड्यात हे मच्छीमार आपले वर्षाचे व्यवहार पूर्ण करतात. त्यानंतरचे पंधरा दिवस ही मंडळी आपल्या होड्या साकारून (दुरुस्ती) ठेवतात. व्यावसायिक अडचणींमुळे मच्छीमारांना वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासमवेत अठरा दिवस देणे शक्‍य होत नाही. माउलींच्या पालखीचे प्रस्थान २५ जून रोजी झाले. मात्र, माउलींची पालखी लोणंदमध्ये असताना या मच्छीमार दिंडीने आळंदीत समाधीचे दर्शन घेऊन आपली पायी वारी सुरू केली. आळंदी निघून दिवेघाट, सासवड (देशमुखवाडी), नीरा, फलटण, बरड, नातेपुते, वेळापूर, असे मुक्काम करीत वाखरीत माउलींच्या सोहळ्याला गाठतात. दररोज पहाटे पाच वाजता निघालेली दिंडी सायंकाळी सातपर्यंत मुक्कामाचा म्हणजे ३५ ते ४० किलोमीटरचा टप्पा गाठतात. माउलींची पालखी विठ्ठलाच्या ओढीने अन्‌ हे मच्छीमार माउलींच्या पालखीच्या ओढीने हे अंतर पार करतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnala Koliwada Fishermen Dindi