wari 2019 : ....अन्‌ तिने डोळ्यांत साठविला रिंगण सोहळा 

सचिन शिंदे
Monday, 8 July 2019

तिला बघितलेलं, सांगितलेलं कळतं; घडणारं सारं उमगतंही; फक्त व्यक्त होता येत नाही अन्‌ चालताही येत नाही, अशा ठाण्याहून व्हीलचेअरवरून आलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिव्यांग स्नेहल किंबहुने व तिच्या कुटुंबियांनी पालखी अन्‌ रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला.

अकलूज - तिला बघितलेलं, सांगितलेलं कळतं; घडणारं सारं उमगतंही; फक्त व्यक्त होता येत नाही अन्‌ चालताही येत नाही, अशा ठाण्याहून व्हीलचेअरवरून आलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिव्यांग स्नेहल किंबहुने व तिच्या कुटुंबियांनी पालखी अन्‌ रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला. पालखी सोहळ्याबद्दल ऐकले होते, स्नेहलसाठी सोहळ्यात सहभागी होता आले. गोल रिंगण पाहून आत्मिक समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया स्नहेलची आई दर्शना व वडील पराग यांनी व्यक्त केली. किंबहुने कुटुंबीय संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील येथे झालेल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगांच्या गजरासह वायुवेगाने धावणाऱ्या अश्वाचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये दिव्यांग स्नेहलची उपस्थिती नजरेत भरत होती. रिंगण डोळ्यांत साठवताना तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज चमकत होते. 

पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. हद्दीवर शासनाकडून जंगी स्वागत झाले. त्यापूर्वी साडेसात वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता अकलूजच्या माने विद्यालयात रिंगण सोहळा झाला. पखवाज वादक, डोक्‍यावर तुळस घेतलेल्या महिला, झेंडेकरी, त्यांनतर मानाचे अश्व धावले. अश्वाने पाचवेळा प्रदक्षिणा पूर्ण केली आणि रिंगण संपले. त्या वेळी उपस्थित वारकऱ्यांनी विविध खेळ केले. त्या सगळ्यात ठाणे येथून आलेल्या किंबहुने कुटुंबियांचे वेगळेपण जाणवत होते. पराग व दर्शना त्यांची दिव्यांग कन्या स्नेहल व मुलगा श्री यांच्यासह सहभागी झाले होते. स्नेहलला व्हीलचेअर होती. सारेच रिंगण दिसेल अशा ठिकाणी जागा धरून भक्त बसतात, तेथे बॅरिकेडच्या शेजारीच बसले होते. अश्व, झेडेंकरी, पखवाजवादक, महिला धावताना स्नेहलला तिचे आई-वडील सांगत होते, ती त्याचा आनंद घेत होती. त्या वेळी उपस्थितांनाही त्याचे आश्‍चर्य वाटत होते. रिंगण डोळ्यांत साठवताना स्नेहलला आनंद होत होता. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज चमकत होते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण पाहण्यासाठी पराग किंबहुने कुटुंबीय खास ठाण्याहून आले आहेत. दिव्यांग स्नेहलला तो अनुभव घेताना गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी अकलूजची निवड केली. पालखीतील शिस्तीचा रिंगण सोहळा त्यांना अनुभवयाचा होता. त्याबाबत दर्शना म्हणाल्या, ""पालखी सोहळा, त्यातील रिंगण सोहळा टीव्हीवर बघत होतो. तो सोहळा बघण्याची इच्छा आज पूर्ण करता आली. मुलगी स्नेहल दिव्यांग आहे, तिला आनंद घेता यावा, यासाठी वारीसारखा दुसरा अनुभव नाही, असेही जाणवून गेले.'' 

आजपर्यंत आम्ही रिंगणाबाबत ऐकून होतो. टीव्हीवरही पाहिले होते. मात्र, प्रत्यक्ष वारीत आज सहभागी झालो. सगळं कुटुंब वारीतील आनंद, त्यातील शिस्त व आत्मिक समाधान घेऊन परत जात आहोत. भक्तिमार्गात अत्यंत महत्त्वाचे असलेले रिंगण पाहिले, अनुभवले. याचे समाधान वाटते. 
- दर्शना किंबहुने, ठाणे (मुंबई) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darshana kimbhune everybody saw the ringan