wari 2019 : वारीतील शिस्त हा जीवनाचाच भाग

विलास काटे 
Tuesday, 2 July 2019

शिस्तीचा सोहळा म्हणूनच याकडे पाहिले जाते. वारी आणि त्यातील शिस्त हा आमच्या जीवनाचा भाग बनला असून,आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विन जिवा सुख नोहे, अशी अवस्था झाल्याची भावना रिसोड (जि. वाशीम) येथील अठरावर्षीय बालाजी बोडके याने व्यक्त केली.

वाल्हे -  संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीच्या आळंदीपासूनच्या वाटचालीत पाऊस सुरू आहे. दिवसभर पावसात भिजतही माउलींच्या नामस्मरणात खंड पडलेला नाही. पहाटेच्या काकडा भजनापासून समाज आरतीपर्यंत वारीत कमालीची शिस्त आहे. शिस्तीचा सोहळा म्हणूनच याकडे पाहिले जाते. वारी आणि त्यातील शिस्त हा आमच्या जीवनाचा भाग बनला असून,आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विन जिवा सुख नोहे, अशी अवस्था झाल्याची भावना रिसोड (जि. वाशीम) येथील अठरावर्षीय बालाजी बोडके याने व्यक्त केली.

वारीच्या वाटचालीबाबत बालाजी भरभरून बोलत होता. त्याने सांगितले की, रंगीबिरंगी रेनकोट घालून वारकरी शिस्तीत चालत होते. अंगावर जलधारा बरसत असतानाही निश्‍चयापासून ढळले नाहीत. दुपारी वाल्ह्याच्या सुकलवाडीतील प्रशस्त तळावर पालखी पोचली. चोपदारांनी चोप उंचावताच टाळांचा निनाद बंद होऊन आरतीला प्रारंभ झाला. आळंदी ते पंढरपूर या वाटचालीत केवळ येथेच दुपारची समाज आरती असल्याने तळावर गर्दी होती.

नीरास्नानासाठी दोघेच पादुका नेणार
माउलींची पालखी मंगळवारी (ता. २) पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, दुपारी माउलींच्या पादुकांना नीरास्नानाचा कार्यक्रम होणार आहे. हुल्लडबाजी होऊ नये, यासाठी फक्त पालखी सोहळामालक राजाभाऊ आरफळकर आणि पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई नीरास्नानासाठी चांदीच्या पादुका घेऊन नदीपर्यंत जातील, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discipline in the wari is part of life