wari 2019 : वैष्णवांच्या मेळ्यात अश्‍वांची दौड! 

व्यंकटेश देशपांडे
Thursday, 4 July 2019

जोशपूर्ण वातावरणात अंगावर गारवा झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा चांदोबाचा लिंबला पोचला. तेथे झालेल्या उभ्या रिंगणातून झालेली अश्‍वांची दौड डोळे भरून पाहताना वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

फलटण - "माउली... माउली'च्या गजराने दुमदुमणारा आसमंत... टाळ- मृदंगाचा टिपेला पोचलेला नाद आणि जोडीला हातातील पताका उंचावत नाचणारे वारकरी... अशा जोशपूर्ण वातावरणात अंगावर गारवा झेलत दंग झालेला वैष्णवांचा मेळा चांदोबाचा लिंबला पोचला. तेथे झालेल्या उभ्या रिंगणातून झालेली अश्‍वांची दौड डोळे भरून पाहताना वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या सोहळ्यानंतर पालखी सोहळा तरडगावला मुक्कामी गेला. 

श्री संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याने आज दुपारी लोणंदकरांचा निरोप घेण्यापूर्वी दुपारी 12 वाजता पालखी तळावर नैवेद्य अर्पण केल्यानंतर माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माउलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी सजविलेल्या रथात पालखी ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकर नागरिकांसह भाविकांनी पालखीला निरोप देण्यासाठी सरहद्द ओढ्यापर्यंत परंपरेप्रमाणे साथ केली. दुपारी अडीच वाजता सोहळ्याने फलटण तालुक्‍यात प्रवेश करताच वाद्यांच्या गजरात आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, सभापती प्रतिभा धुमाळ, प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. 

माउलींच्या पालखीने तालुक्‍यात प्रवेश केल्यानंतर मजल- दरमजल करत सोहळा चार वाजता चांदोबाचा लिंब येथे पोचला. दरम्यान, पुढील दिंडीत असलेल्या वारकऱ्यांनी भारूड, भजन, गात धार्मिकतेचा आनंद लुटला. चांदोबाचा लिंब येथे पालखी आल्यावर राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी वारीतील पहिले उभे रिंगण लावून घेतले. दिंडीकऱ्यांनी चढाओढीने अभंगाच्या ताना मारत वातावरण अधिक भक्तिमय करण्यात आनंद मानला. दरम्यान, अश्‍व धावण्याच्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालून वातावरण धार्मिकतेकडे व प्रसन्नतेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न परिसर खुलवत गेला. 

सर्व दिंडीकऱ्यांच्या नजरा सोहळ्याच्या अग्रभागाकडे लागल्या असतानाच दौडत आलेल्या दोन्ही अश्‍वांना पाहताच वारकरी दहभान विसरून माउलीचा गजर करण्यात दंग झाले. पाहता-पाहता समोरून दौडत आलेल्या अश्‍वांनी माउलीच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्‍वर पादुकांचे दर्शन घेतले. त्या वेळी सेवेकऱ्यांनी अश्‍वांच्या गळ्यात पुष्पहार घातले. गुळ, हरभऱ्याचा शिधा दिला. तेथून पुन्हा अश्‍व दौडत सोहळ्याच्या अग्रभानी पोचताच चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शविल्याबरोबर सोहळा माउलीचा गजर करीत पुढे मार्गस्थ झाला. 

सायंकाळी सव्वापाच वाजता सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोचताच मान्यवरांनी पालखीचे स्वागत करून पालखी रथातून खाली उतरवून माउलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत-गाजत गावात निघाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first goal ringan in chandoba limb