#saathchal वारीत खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती 

विलास काटे 
Saturday, 6 July 2019

‘पहिल्या वर्षी वडिलांशी पैज लावून वारीत सहभागी झाले आणि ती पैज जिंकली. जीवनातील खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती झाली आणि वारीने जीवनाचे सार्थक झाले,’’ अशी भावना पुणे जिल्ह्यातील शिक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. 

बरड -  ‘‘पहिल्या वर्षी वडिलांशी पैज लावून वारीत सहभागी झाले आणि ती पैज जिंकली. जीवनातील खऱ्या आत्मिक सुखाची प्राप्ती झाली आणि वारीने जीवनाचे सार्थक झाले,’’ अशी भावना पुणे जिल्ह्यातील शिक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. 

माउलींच्या सोहळ्यात अकरा क्रमांकाच्या भोपळे दिंडीत शिक्षा गायकवाड गेल्या तीन वर्षांपासून चालत आहे. अभियंता असलेल्या गायकवाड यांनी आजीसोबत वारीला जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी वडील म्हणाले होते की तू सासवडपर्यंतसुद्धा चालणार नाहीस, जाऊ नकोस. त्यावर वडिलांसोबत पैज लावली. दिवे घाटात त्रास झाला, चालण्याची सवय नसल्याने पाय दुखू लागले; पण रडत रडत दिवे घाट पार केलाच. सासवडला औषध घेऊन पंढरीची वारी पूर्ण केली आणि वडिलांना फोन केला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तेव्हापासून वारीत सहभागी होते आहे. वारी हा सुखमय प्रवास आहे. तो चालताना जीवन कसे जगायचे हे समजते. दिंडीतील लोक आपले कुटुंबीय होतात. जीवन जगताना तडजोड कशी करायची, याचे शिक्षण वारीतून मिळते. सुदैवाने माझा विवाह वारकरी संस्कार असलेल्या घरातच झाला, त्यामुळे लग्नानंतरही मी वारी करते आहे. वारीत समानतेची शिकवण मिळते. वारी ही आनंदी वाटचाल असून त्यातून मिळणारा आनंद वर्षभर पुरतो. वारीवर निष्ठा ठेवून चालत राहिले, की सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. त्याच सुखाची शिदोरी जीवनात फलदायी ठरते, याचा प्रत्यय मला आला आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

सोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश
फलटणकरांचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा आज सकाळी बरडकडे मार्गस्थ झाला. विडणीत न्याहारी करून दुपारचे जेवण पिंपरद येथे झाले. सोहळा सायंकाळी बरड मुक्कामी विसावला. दरम्यान, माउलींची पालखी उद्या (ता. ६) सकाळी धर्मपुरी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaikwad expressed his feelings about wari