wari 2019 : वारीत 'मोबाईल चार्जिंग' ठरलं लाखोंची कमाई देणार माध्यम

अशोक मुरुमकर
Wednesday, 10 July 2019

पालखीत असलेल्या एका चार्जिंग पॉइंटवर किमान 300 मोबाईल चार्ज होतात. सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंट सुरू असतात. वारकऱ्यांची मोबाईल चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

भंडीशेगाव -  वारीत मोबाईल चार्जिंगमधून सध्या लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिंड्यांमध्ये चालत आलेल्या वारकऱ्यांकडे मोबाईल असतात, मात्र त्याला चार्जिंग कोठे करायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. यावर युवकांनी उपाय काढला असून, त्यातून एका दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीत सुमारे चार लाख वारकरी आहेत. आळंदीपासून पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ झाल्यापासून रोज वेगळ्या ठिकाणी मुक्काम असतो. तिथे वारकऱ्यांच्या मोबाईलला चार्जिंग करण्याची व्यवस्था नसते. ही अडचण लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील दिगांबर रुद्रे यांनी वारकऱ्यांसाठी जागेवर मोबाईल चार्जिंग करून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ते साध्या मोबाइलला एकवेळच्या चार्जिंगसाठी 10 रुपये आणि ऍड्राइड मोबाईलसाठी 20 रुपये घेतात. साध्या मोबाईलला अर्धा तास, तर ऍड्राइड मोबाईलला दीड ते दोन तास चार्जिंगसाठी लागतात. 

मोबाईल याचा-त्याला होऊ नये म्हणून वारकऱ्यांना टोकन दिले जात आहे. एकावेळी 40 मोबाईल चार्जिंग होतील, अशी व्यवस्था रुद्रे यांनी केली आहे. यासाठी ते पेट्रोलवर चालणारे जनरेटर वापरत आहेत. याप्रमाणे पालखी सोहळ्यात आणखी काही जणांनी चार्जिंगची व्यवस्था केली आहे. पालखीत असलेल्या एका चार्जिंग पॉइंटवर किमान 300 मोबाईल चार्ज होतात. सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंट सुरू असतात. वारकऱ्यांची मोबाईल चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of turnover through mobile charging in wari