पंढरीत भक्तीचा महापूर 

अभय जोशी
Saturday, 13 July 2019

पंढरपूर - आषाढीच्या आनंद सोहळ्यासाठी आलेल्या बारा लाखांहून अधिक वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू भक्तीचा महापूर आला होता. आषाढी एकादशीची चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केली होती. दिवसभर टाळ-मृदंगांच्या गजरात, दिंड्या-पताकांसह भाविक नगरप्रदक्षिणेला जाताना दिसत होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज तब्बल सव्वीस तास लागत होते. 

शुक्रवारी पहाटे तीनपासून चंद्रभागा घाटावर स्नानासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. चंद्रभागा घाट, कासार घाट आणि महाद्वार घाटांवर स्नानासाठी नदीकडे येणाऱ्या आणि स्नान करून मंदिराकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची अफाट गर्दी झाली होती. या घाटांच्या परिसरात ढकलाढकली होऊ नये यासाठी यंदा दक्षता म्हणून पोलिसांनी उपाययोजना केली होती. घाटावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांसाठी मध्यभागी दोर लावून गर्दीचे नियंत्रण करण्यात येत होते. 

विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज एकादशी दिवशी गोपाळपूरच्या पुढे रांझणी रस्त्यावर गेली होती. आज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले संतोष अप्पा मिसाळ (रा. वेरुळ, जि. औरंगाबाद) यांना विचारले असता ते म्हणाले, ""काल सकाळी सात वाजता गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांगेत उभा राहिलो होतो. सव्वीस तासांनंतर आज सकाळी नऊ वाजता दर्शन झाले. 

पदस्पर्श रांगेच्या तुलनेत मुखदर्शन रांग यंदा नेहमीपेक्षा जास्त लांब जात होती. लाखो भाविकांमुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than twelve lakhs devotees in the Pandharpur