wari 2019 : वारी कॅशलेसच्या मार्गावर! 

अशोक मुरूमकर
Monday, 8 July 2019

अनेक वारकऱ्यांकडे "एटीएम कार्ड' असून, ते व्यवहारासाठी त्याचा वापर करीत असल्याने आता वारी "कॅशलेस'च्या मार्गावर आहे.

माळशिरस - अनेक वारकऱ्यांकडे "एटीएम कार्ड' असून, ते व्यवहारासाठी त्याचा वापर करीत असल्याने आता वारी "कॅशलेस'च्या मार्गावर आहे. वारकरी जवळ पैसे न ठेवता हवे तेव्हा एटीएममधून पैसे काढत आहेत. जागेवर पैसे मिळावेत म्हणून बॅंकांचे "एटीएम'ही वारीमध्ये आहे. 

दिंडीत चालत जात असताना वाटेत खर्चायला म्हणून वारकरी पैसे जवळ ठेवतात. काहीवेळा पैसे गर्दीत चुकून खाली पडतात, तर काहीवेळा चोरीला जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अनेक वारकरी एटीएम कार्ड जवळ ठेवत आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी किंवा वाटेत हवे तेव्हा थोडेथोडे पैसे काढत आहेत. गरज पडल्यास घरच्या व्यक्तींना पैसे टाकायला सांगत आहेत. वारकऱ्यांना एटीएमची सुविधा मिळावी म्हणून समर्थ बॅंकेने संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत एटीएमची गाडी पाठवली आहे. त्यातून पहिल्या दिवशी 20 ते 25 व्यवहार झाले होते. त्यांत दिवसेंदिवस वाढ होत असून, आता दररोज 70 ते 80 व्यवहार होत आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडथळ्यामुळे या व्यवहारांना काही मर्यादा येत आहेत. 

गेल्यावेळी वारीत एकाजवळचे पैसे चोरीला गेले. ते पाहून यंदा रोख रक्कम घेतली नाही. एटीएममुळे पैशांची अडचण येत नाही. 
- सुरेश शिंदे, वारकरी 
 

बॅंकेच्या ग्राहकसेवा केंद्रातून आधार कार्डद्वारेही पैसे मिळत आहेत, त्यामुळे जवळ पैसे ठेवण्याची गरज पडली नाही. 
- सोमनाथ भालेकर, वारकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online transactional increase from Warkaris