wari 2019 : संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर विसावल्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 July 2019

लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०) मुक्कामासाठी विसावल्या आहेत. 

सोलापूर - 
भाग गेला, शीण गेला । 
अवघा झाला आनंद ।
प्रेमरस बैसली मिठी । 
आवडी लाठी मुखाची ।।

लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०) मुक्कामासाठी विसावल्या आहेत. 

आता विठुरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ वारकऱ्यांना अनिवार झाली आहे. टाळ-मृंदगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पालखी मार्ग दणाणून गेला आहे. दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या (शुक्रवारी) होत आहे. सोहळ्यातील विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता ही महापूजा होईल. 

आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यभरातील सगळ्या पालख्या बुधवारी एकाच मार्गावर आल्याने पंढरपूर-पुणे महामार्गावर भक्तीचा आगळा अनुभव प्रत्ययास येत होता. टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानाने उत्साहाला भरते आले होते. 

पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विठुरायाच्या भेटीची ओढ अनिवार झाल्याचे दिसत होते. 

पंढरीत वारकऱ्यांची रीघ
आषाढी वारीचा मुख्य सोहळा शुक्रवारी होणार असला तरी, बुधवारपासूनच (ता. १०) पंढरपुरात वारकऱ्यांची रीघ लागली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहने पंढरपूरच्या चोहोबाजूंनी दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: palkhi in wakhari