अवघा झालासे आनंद!

विलास काटे  
Monday, 23 July 2018

पंढरपूर - खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत अठरा दिवसांपूर्वी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज पंढरीत प्रवेश केला. विठूरायाच्या भक्तीने शेकडो किलोमीटर चालत आलेला भक्तीचा महासागर चंद्रभागेच्या काठावर विसावला. भाग गेला, शीन गेला । अवघा झालासे आनंद।। असा भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आळंदीहून निघालेला हा वैष्णवांचा मेळा शनिवारी वाखरीत मुक्कामी होती. सकल संतांच्या पालख्या वाखरीत असल्याने दर्शनासाठी गर्दी झाली होती. वाखरीचा तळ वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला होता. आता वारी संपणार ही हुरहूर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. मात्र, वारी विठुचरणी रुजू होणार असल्याने आनंदाची भावनाही चेहऱ्यावर झळकत होती. अशा वातावरणात आज दुपारी दोनच्या सुमारास माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत सोहळ्याने या वारीतील शेवटची वाटचाल सुरू केली. या वेळी वारकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद होता. आल्हाददायक वातावरणात पालखी सोहळा वाखरीजवळील पुरंदरे मळ्याजवळ आला. तेथे भाटे यांच्या रथात परंपरेप्रमाणे पालखी ठेवण्यात आली. वडार समाजाच्या भाविकांनी हा रथ ओढला. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक आहे, याची प्रचिती या वेळी आली. इसबावीजवळ रथ थांबविण्यात आला. तेथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण झाले. रिंगणात अश्वाने वेगात फेरी मारून लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी सोहळ्याचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्याकडे दिल्या. त्यांनी त्या गळ्यात घालून पायी वाटचाल सुरू केली. त्यांच्या उजव्या बाजूला राजाभाऊ आरफळकर, तर डाव्या बाजूला राणूमहाराज वासकर चालत होते. पालखी सोहळा रात्री नाथ चौकातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पोचला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Sant Dnyaneshwar maharaj palkhi