पांडुरंगाच्या दर्शनाची आस!

सचिन शिंदे
Monday, 23 July 2018

पंढरपूर - देहूपासून निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सायंकाळी पंढरीत पोचला. सगळ्याच पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. संतभार पंढरीत दाखल झाल्याने आणि त्याच पावनभूमीत आल्याने जीवन धन्य झाल्याची भावना सत्तरी ओलांडलेल्या द्रौपदा रावंडले व शारदाबाई दारकोंडे यांनी व्यक्त केल्या. रथामागे ७६ व्या असलेल्या गंगाखेड (जि. परभणी) येथील दिंडीत त्या चालतात. 

वाखरी येथील मुक्काम आटोपून संतांच्या पालख्यांबरोबर त्या पंढरीत दाखल झाल्या आहेत, त्या वेळी त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. आता पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पंढरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवरून त्याची अनुभूती येत होती. 

वाखरी येथे शनिवारी संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. रविवारी पहाटेपर्यंत रांगा होत्या. पालखी सोहळा आज दुपारी एकच्या सुमारास मार्गस्थ झाला. विठूरायाची भेट जवळ आल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आनंदाचे डोहे, आनंद तरंग अशा भावना मनात घेऊन सुरू झालेली सोहळ्याची वाटचाल कधी संपली, ही कळाले नाही. 

तुकोबांचा पालखी सोहळा पंढरीत दाखल होताच तेथे पादुका अभंग झाला. त्यानंतर लगेचच उभा रिंगण सोहळा रंगला. पांडुरंगाच्या जयघोषात रस्त्यावरच उभे रिंगण लावण्यात आले. भरधाव अश्वाने पालखीस दोनवेळा फेरी मारली. त्या वेळी अश्वाच्या पायाखालील धूळ कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. त्याच गर्दीत सत्तरी ओलांडलेल्या दोन आजींनी लक्ष वेधले. द्रौपदा रावंडले व शारदाबाई दारकोंडे या त्या दोघी. गर्दीतही अश्‍वाच्या पायाखालची धूळ कपाळी लावण्यास धडपडत होत्या. गंगाखेड येथील दिंडीत स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 

संत सोहळा जीवनाचं सार सांगतो, असे द्रौपदाबाई यांनी सांगितले. विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली असून, रांगेत उभे राहून दर्शन घेणार आहे. संतभार पंढरीत असताना आपणही येथे असणे यासारखे दुसरे भाग्य ते काय, असेही त्या म्हणाल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur sant tukaram maharaj palkhi