wari 2019 : सोशल मीडियाला पंढरीच्या वारीची भुरळ 

शंकर टेमघरे  
शुक्रवार, 5 जुलै 2019

आषाढी वारीत सोशल मीडियाचे प्रमाण खूपच वाढले आहे. माउलींच्या पादुका पूजन, वारकरी दिंड्या, समाज आरती, रिंगण यांसारखे व्हिडिओ काही सेकंदांत व्हायरल होत आहेत. मोबाईल असलेला प्रत्येकजण वारीचे छायाचित्र किंवा व्हिडिओ व्हायरल करतो आहे, त्यामुळे वारीची वाटचाल मिनिटामिनिटाला जगभर समजत आहे.

फलटण - आषाढी वारीत सोशल मीडियाचे प्रमाण खूपच वाढले आहे. माउलींच्या पादुका पूजन, वारकरी दिंड्या, समाज आरती, रिंगण यांसारखे व्हिडिओ काही सेकंदांत व्हायरल होत आहेत. मोबाईल असलेला प्रत्येकजण वारीचे छायाचित्र किंवा व्हिडिओ व्हायरल करतो आहे, त्यामुळे वारीची वाटचाल मिनिटामिनिटाला जगभर समजत आहे. यंदाच्या वारीत हे प्रमाण अधिकाधिक अधोरेखित झाले आहे. परिणामी पंढरीच्या या पारंपरिक वारीची सोशल मीडियाला भुरळ पडली आहे.  

पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांमधून वारी महाराष्ट्रभर समजत होती. दररोज घरबसल्या पेपर वाचून भाविक वारीच्या वाटचालीतील आनंद घेत होते. त्यानंतर वारीत वाहिन्यांचा प्रवेश झाला. न्यूज तसेच कार्यक्रम स्वरूपात वारी चित्रीकरणाच्या रूपात घरबसल्या बघायला मिळू लागली. वारीतील ठरावीक क्षण दूरचित्रवाणीच्या माध्यमातून वाहिन्या घरोघर पोचवू लागल्या. पाच वर्षांपासून सोशल मीडिया ही संकल्पना वारीत आली. 

पहिल्या वर्षी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काहींनी वारी केली. त्या वेळी नेटची सर्व यंत्रणा राबवावी लागत होती. चांगली रेंज असेल तिथेच फेसबुकच्या माध्यमातून वारी जगभर पोचू लागली. गेल्या दोन- तीन वर्षांपासून फेसबुकबरोबर व्हॉट्‌सॲप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसू लागल्याने त्याचे प्रमाण अधिक दिसू लागले. यंदा त्याचा अतिरेक होत आहे. वारीच्या वाटचालीतील प्रत्येक क्षण व्हायरल होताना दिसू लागला आहे. पालखीच्या प्रस्थान सोहळ्यापासून सुरू झालेली ही सोशल मीडियाची वारी दिवे घाटापुरती मर्यादित राहिलेली नाही. सासवड येथील मुक्काम, जेजुरीचा भंडारा, नीरा स्नान, तसेच लोणंदनगरीतील समाज आरतीपर्यंतच्या सर्व घटना काही मिनिटांत लाखो मोबाईलवरून व्हायरल झाल्या. चांदोबाच्या रिंगणात तर अतिरेक झाला. हजारो मोबाईलधारकांनी हा क्षण व्हायरल केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रेंज कमी असल्याने अडचणी आल्या. मात्र, बहुतांश ठिकाणी सोशल मीडियाची वारी जोमात सुरू आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाला येणारी भाविकांची गर्दी रथाजवळ, माउलींच्या तंबूजवळ, अश्वासमवेत सेल्फी घेताना दिसते, तेव्हा त्यातील अतिरेक दिसून येतो. वैयक्तिक स्वरूपात होणारा वापर ओंगळवाणा वाटतो.  

दिंड्यांमधून वारीत चालणाऱ्या तरुण वारकऱ्यांकडूनही आपल्या दिंडीचे छायाचित्रण करून घेतले जात आहे. भजनाच्या चालीचे तसेच दिंडीत सुरू असलेल्या खेळांचे शूटिंग करून ते व्हायरल करण्यात येत आहे. तर, काही तरुण फेसबुक लाइव्ह करताना दिसतात. सामाजिक संस्थांनी सोशल मीडियाच्या आधारे आपले उपक्रम समाजापर्यंत पोचविण्याचे काम सुरू केले आहे. माध्यमांनी ऑनलाइनच्या टीम वारीसोबत पाठविल्या आहेत. तसेच, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काही तास दिंड्या थंडावल्या
गुगलमध्ये समस्या निर्माण झाल्याने फेसबुक, व्हॉट्‌सॲपवरील दिंड्यांची गती मंदावली होती. काही तास व्हिडिओ अपलोड तसेच डाउनलोड होत नव्हते. वारीतील सोशल मीडियावर काम करणाऱ्यांना ही समस्या जास्तच जाणवली... गुरुवारी सकाळनंतर ती समस्या सुटल्याने नेटिझनने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

सोशल मीडिया वापरताना घ्या काळजी
वारी हा परंपरेचा सोहळा लवकरात लवकर व्हायरल करताना काळजी घेण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा परंपरांना छेद जाईल, अशा पद्धतीने कोणतेही चित्रण न करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सध्या व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पोचविण्याचे प्रकार होत आहेत. त्यावर आवर घालणे गरजेचे आहे. वैयक्तिक पातळीवर केलेले व्हिडिओ काढून ते चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात तरुणाई गुंतत असल्याचे चित्र पाहायला मिळते. हे थांबले पाहिजे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या परंपरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandhrichi wari on socialmedia