wari 2019 : वारीचा आनंददायी अनुभव

सचिन शिंदे
सोमवार, 1 जुलै 2019

‘‘पालखी सोहळ्यात वारकरी कसे राहतात? रोजचे काम कसे करतात? सारे कसे आनंदायी आहे. ते अनुभवण्यासाठी वारीत सहभागी झाले...’’ बारावी झालेली राजश्री तिकोळे सांगत होती.

वरवंड  -‘‘पालखी सोहळ्यात वारकरी कसे राहतात? रोजचे काम कसे करतात? सारे कसे आनंदायी आहे. ते अनुभवण्यासाठी वारीत सहभागी झाले...’’ बारावी झालेली राजश्री तिकोळे सांगत होती. वारीत अनेक गोष्टी शिकले. ती शिकवण रोजच्या जगण्यात कशी घेता येईल, याचा विचार करीत आहे, असेही तिने आवर्जून सांगितले.

राजश्रीची ही पहिलीच वारी आहे. ती रथामागील १४८ क्रमांकाच्या कऱ्हाड तालुक्‍यातील उंब्रज, चरेगावकरांच्या दिंडीतून चालते. तिची आजी तिच्या सोबत आहे. देहूपासून राजश्री वारीत सहभागी आहे. तेथील वातावरणाने भारावली आहे. पालखी सोहळ्यात कधी दिंडीसोबत, तर कधी दिंडीच्या पुढे चालून ती लोकांशी बोलते आहे. औत्सुक्‍याने माहिती घेते आहे. पहिल्यांदाच वारीत आलेल्या राजश्रीचा उत्साह दिसत होता.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतहून वरवंडला मार्गस्थ झाला. पावसाळी वातावरण व हवा अंगावर घेत सोहळा पुढे सरकत होता. चौफुल्याजवळ पालखी सोहळ्याला पावसाने चिंब भिजविले. भर पावसात चौफुल्यावर पालखीचे स्वागत करण्यात आले.

पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेते आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. पुढे शिकायची इच्छा आहे. त्यापूर्वी आई व आजी यांच्यासारखी एकदातरी वारी करायची होती. नव्या गोष्टी अनुभवण्यासाठी, शिकण्यासाठी वारीत आले आहे. 
- राजश्री तिकोळे,  युवा वारकरी, गमेवाडी (ता. पाटण)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashree tikole shares wari pleasant experience