esakal | #SaathChal अपंगत्वावर मात करून धरली पंढरीची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

अकलूज - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बुधवारी येथील माने विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेले गोल रिंगण.

#SaathChal अपंगत्वावर मात करून धरली पंढरीची वाट

sakal_logo
By
सचिन शिंदे

अकलूज - विठुरायाच्या सोहळ्यात आपण अपंग आहोत, याचे भानच राहात नाही, अकलूजच्या माने विद्यालयात रंगलेल्या गोल रिंगण सोहळ्यात तीनचाकी सायकलीवरून धावणारे पोपट सर्जेराव पताळे सांगत होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर माने विद्यालयात रिंगण सोहळा झाला. त्यात झेंडेकऱ्यांबरोबर तीनचाकी सायकलवरून धावणारे सत्तरीतील पताळे यांच्याकडे लक्ष गेले. 
चित्ती तुझे पाय 
डोळा रूपाचे ध्यान,
अखंड मुखी नाम 
तुमचे वर्णावे गुण 

असा ध्यास घेऊन पताळे अपंगत्वावर मात करत पंढरीच्या वाटेवर निघाल्याचे जाणवले.

सकाळी नीरा स्नानानंतर सोलापूर जिल्ह्यात जंगी स्वागत झाले. त्यानंतर माने विद्यालयात दिंड्या दाखल झाल्या. साडेदहाच्या सुमारास रिंगण सोहळा लागण्यास सुरवात झाली. पादुकांची प्रदक्षिणा झाली. वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात पालखीचे स्वागत केले. झेंडेकरी, तुळस घेतलेल्या महिला, टाळकरी व पखवाज वादक रिंगणात धावले. त्यानंतर अश्व धावले. माउलींच्या अश्वाने वायू वेगाने तीन फेऱ्या पूर्ण केल्या. डोळ्यात साठवावा असा गोल रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर वारकऱ्यांनी पारंपरिक खेळ खेळले. पताळे हे देहूकरांच्या दिंडीतून चालतात. रथामागे त्यांची दिंडी आहे. खंडाळी (ता. माळशिरस) त्यांचे मूळ गाव. लहानपणी पोलिओने दोन्ही पाय निकामी झाले. सन १९७० पासून संत तुकाराम महाराज पालखीसोबत येत आहेत.

वारीत आज 
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे रंगणार
    पालखी सोहळा बोरगावला मार्गस्थ होणार