esakal | #SaathChal टाळ-मृदंगांचा गजर आणि वैष्णवांचा जल्लोष...
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदवडे (जि. सोलापूर) - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बुधवारी झाले.

#SaathChal टाळ-मृदंगांचा गजर आणि वैष्णवांचा जल्लोष...

sakal_logo
By
विलास काटे

माळशिरस - माउलींच्या पालखी सोहळ्यात वर्षानुवर्षे रिंगण सोहळा होतो; पण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह का असतो, हा प्रश्न पडतो. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या माउलींसमवेत रिंगणात ‘ज्ञानोबा- तुकाराम’ नामाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याने वारीत चालताना आलेला शीण कमी होतो, अशी भावना आज वारकऱ्यांनी व्यक्त केली. माउली आणि वारकऱ्यांचे अनोखे नाते आज पुरंदवडे येथील रिंगणात अनुभवण्यास मिळाले. टाळ- मृदंगांचा गजर, ज्ञानोबा- तुकारामांचा जयघोष आणि वैष्णवांचा जल्लोष...

सकाळी नातेपुतेकरांचा निरोप घेऊन निघालेल्या पालखी सोहळ्याने मांडवीत दुपारचे भोजन घेतले आणि माळशिरसची वाट धरली. पुरंदवडे येथील माळरानावर सोहळ्यातील पहिले रिंगण होणार होते. दुपारी दोनच्या सुमारास सोहळा पुरंदवड्याच्या माळरानावर आला. रिंगण पाहण्यासाठी आधीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दिंड्या गोलाकार उभ्या राहिल्या. अश्व रिंगणात आले आणि माउलींची पालखी मधोमध आली. चोपदारांच्या इशाऱ्यानंतर भोपळे दिंडीतील मानकरी धावला. त्यापाठोपाठ अश्वाला रिंगण दाखविण्यात आले आणि स्वाराच्या अश्वासह माउलींचा अश्व रिंगणात सोडण्यात आला. तब्बल दोन फेऱ्या मारून माउलींच्या अश्वाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. माउलीनामाच्या जयघोषाने पुरंदवड्याचा परिसर दणाणून गेला. त्यानंतर दिंड्यांमध्ये खेळ रंगले. उडीच्या खेळाने तर आनंदाचा परमोच्च बिंदू गाठला. रिंगणानंतर सोहळा माळशिरसला विसावला.

वारीत आज
    सकाळी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण
    सायंकाळी इसबावीजवळ धावा 
    वेळापूरच्या माळरानावर भारुडे