#SaathChal पंढरीत विक्रमी गर्दीची शक्‍यता

शंकर टेमघरे
Thursday, 19 July 2018

समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक

समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक
माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दर वर्षीच्या तुलनेत सुमारे 25 ते 30 टक्के भाविक अधिक आहेत. तसेच, शेतीची उर्वरित कामे उरकून थेट पंढरीत येणाऱ्यांची संख्या पाहिली, तर यंदाची आषाढी वारी विक्रमी भरेल, असे चित्र दिसून येते.

यंदा पावसाने वेळेपूर्वी महाराष्ट्रात हजेरी लावली. पहिला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानापासूनच भाविकांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

माउलींच्या सोहळ्यात सुमारे साडेतीन ते चार लाख; तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अडीच ते तीन लाख भाविक आहेत. तसेच, मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाई, त्र्यंबकेश्वरमधून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज व सासवडमधून निघालेल्या संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लोणंद, फलटणमधून, तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती, इंदापूरमधून सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांमध्ये भाविकांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच वाहनांची संख्याही अधिक असल्याने पोलिसांची कसरत होत आहे. जवळपास सर्वच पालखी सोहळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांची संख्या लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासनाने, तसेच पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू हे पालखीसोबत चालत होते. तसेच वारीतील गर्दी, तसेच वाहतुकीबाबत नियोजन करीत होते. आगामी दोन दिवसांत थेट वाहनाने पंढरीत येणाऱ्या भाविकांची रीघ सुरू होईल.

पंढरपूरमध्ये पालखी सोहळ्यांमधून आणि थेट असे मिळून सुमारे बारा लाख भाविक येतील, अशी शक्‍यता गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले आहे. राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे बळिराजा मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाला आहे. अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, वारकऱ्यांनी सहकार्य करावे.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर

पाऊस चांगला झाल्याने मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. यंदा वारकऱ्यांची संख्या सुमारे दीडपट अधिक आहे. महिलांची संख्या लक्षणीय आहे.
- ऍड. विकास ढगे, सोहळाप्रमुख, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari tukaram maharaj dnyaneshwar maharaj crowd