esakal | #SaathChal वारकऱ्यांना वेड लागले विठुरायाचे...
sakal

बोलून बातमी शोधा

SaathChal

रिंगण, धावा, भारुडांमुळे रंगत
माउलींच्या सोहळ्यात सकाळी खुडूस फाट्यावर दुसरे गोल रिंगण रंगले. राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांनी रिंगण लावले. या वेळी पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख योगेश देसाई, ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते. अश्वांच्या बेफाम दौडेने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर सोहळ्यातील एकेका दिंडीला चोपदारांनी वेळापूरजवळील धाव्याजवळून खाली सोडले. सर्व सोहळ्याने धावा केला. उतार संपल्यानंतर पालखी थांबली. तेथे शेडगे दिंडी क्रमांक तीनमध्ये मानाचे भारूड झाले. ज्येष्ठ भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू यांचे भारूड झाले आणि पालखी वेळापूर मुक्कामी थांबली.

#SaathChal वारकऱ्यांना वेड लागले विठुरायाचे...

sakal_logo
By
विलास काटे

वेळापूर (जि. सोलापूर) - ‘बाई मी वेडी गं वेडी....’ पंढरीच्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी हा वेडा आहे, पण तो वेडा आहे पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा... संत एकनाथ महाराजांच्या भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी वारी प्रबोधनाची वाहती गंगाच आहे, अशी भावना नगर जिल्ह्यातील खामगाव येथील महेश आगळे या युवा वारकऱ्याने व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दिंडी नंबर ३२ मध्ये महेश चालत आहे. वेळापूरजवळ माळरानावर भारुडे रंगली होती. त्या वेळी महेश बोलत होता... ‘संतांनी अभंगांतून समाज सुधारण्याचे काम केले. मनोरंजनाबरोबर प्रबोधनही केले. त्यांची परंपरा आजही वारकरी संप्रदायात अखंडपणे प्रवाहित आहे. संतांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा यांच्यावर मात करण्यासाठी भारुडांची रचना केली. विनोदी किंवा रूपक स्वरूपातील अभंगांमधून त्यांनी समाजाचे नेमकेपणाने कान टोचले. ‘बाई मी वेडी...’ या भारुडातील वेडी म्हणजे खरी वेडी नाही, तर ती विठ्ठलनामाची वेडी, असा अर्थ संतांनी लावला. तसेच विंचू चावला... विंचू चावला म्हणजे विकारांचा विंचू चावला की माणसे जशी वागतात, त्यावर प्रबोधन केले आहे. बहिरा म्हणजे कानाने बहिरा नाही, तर हरिनाम ज्याच्या कानात जात नाही तो. देवाचे नाम मुखाने घेत नाही तो खरा मुका. पंढरीची वारी करीत नाही तो पांगळा, असे संतांना म्हणायचे आहे. वारी हा भक्तीचा प्रवाह आणि समाजप्रबोधनाची अखंड गंगा आहे. सध्याची पिढी मोबाईलमध्ये रमली आहे. त्यांच्यापर्यंत भारुडाच्या रचना पोचल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांच्यात बदल होईल. नवी पिढी बदलली तरच समाज बदलेल.’