#SaathChal विठुरायाच्या सशुल्क दर्शनाची गरज

भारत नागणे
सोमवार, 9 जुलै 2018

पंढरपूर - वाढती महागाई आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी 100 रुपये शुल्क आकारून उत्पन्न वाढवावे, असा मतप्रवाह भाविकांमधून पुढे येऊ लागला आहे. त्यानंतर मंदिर समितीनेही व्हीआयपींसाठी सशुल्क दर्शन सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. आषाढीनंतर सशुल्क दर्शन सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सावळ्या विठुरायाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी तासन्‌तास भाविक रांगेत उभे राहतात, तर दुसरीकडे व्हीआयपींच्या नावाखाली दररोज किमान दोन ते तीन हजार भाविक थेट दर्शन घेतात. याच व्हीआयपी भाविकांकडून 100 रुपये शुल्क घेतले, तर दररोज किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीच्या दानपेटीत जमा होण्यास मदत होईल. आजही यात्रेचा कालावधी वगळता ऑनलाइन दर्शन सुविधेमुळे हजारो भाविकांना मोफत आणि वेळेत दर्शन मिळते. ऑनलाइन दर्शन सुविधेमुळे रांगेतील भाविकांना काही प्रमाणात थांबावे लागते. शिवाय दररोज येणाऱ्या व्हीआयपी भाविकांनाही दर्शनासाठी सोडले जाते. त्यामुळे दर्शन रांग काही प्रमाणात रोडावते.

भाविकांमधूनच मागणी
पंढरपुरातही व्हीआयपी दर्शनासाठी 100 रुपये शुल्क आकारावे, अशी मागणी आता भाविकांमधूनच जोर धरू लागली आहे. सध्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे वार्षिक सुमारे 25 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न जाते. यामध्ये कर्मचारी पगार आणि मंदिर व्यवस्थापनाचा खर्च केला जातो. उत्पन्न आणि खर्च पाहाता समितीच्या हाती फारसे काही शिल्लक राहत नसल्याचे दिसून येते. भाविकांसाठी अधिक सोयीसुविधा देण्यासाठी उत्पन्नात वाढ करणे गरजेचे आहे. उत्पन्नवाढीसाठी व्हीआयपी लोकांसाठी सशुल्क दर्शन सुरू करणे हा एकमेव आणि चांगला पर्याय सध्यातरी मंदिर समिती व्यवस्थापनाकडे आहे.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Vittal Darshan Fee