wari 2019 : माउलींच्या स्वागताला वरुणराजाही बरसला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

 ‘ज्ञानोबा- माउली, माउली- तुकाराम’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी बरड (ता. फलटण) येथे भाविकांनी वरुण राजाच्या साक्षीने उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असून, उद्या (शनिवारी) सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. 

दुधेबावी - ‘ज्ञानोबा- माउली, माउली- तुकाराम’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी बरड (ता. फलटण) येथे भाविकांनी वरुण राजाच्या साक्षीने उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असून, उद्या (शनिवारी) सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. 

सकाळी नऊ वाजता विडणी येथील न्याहरीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने विश्रांती घेतली. तेव्हा विडणीकरांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. विडणी व परिसरात आज पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. 

सरपंच रूपाली अभंग, उपसरपंच अमोल नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, पोलिस पाटील धनाजी नेरकर, महात्मा फुले युवक संघटनेचे अध्यक्ष सचिन अभंग, संदीप शिंदे, तसेच ग्रामस्थांनी माउलींचे स्वागत केले. विडणी येथे सोनवडी, अलगुडेवाडी, राजाळे भागातून असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर सोहळ्याचे पिंपरदकडे प्रस्थान  झाले. 

पिंपरद (ता. फलटण) येथे पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबल्यावर उपसरपंच जीवन भगत, ग्रामसेवक नरसिंग शेळके आदींच्या उपस्थितीत विविध मंडळांच्या वतीने भाविकांना अन्नदान, चहा, फळांचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान परिसरात काल मध्यरात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. वाजेगाव येथेही भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. सायंकाळी बरड येथे सोहळ्याचे पावसाच्या हजेरीने स्वागत केले. 

या वेळी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हणमंत पाटील, गटविकास अधिकारी किशोर माने, विस्तार अधिकारी संजय बाचल, सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, शिवकुमार कोळी, प्रीतम लोंढे, शेखर काशीद, विष्णूपंत गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित  होते. 

बरड येथे मिरढे, जावली, नाईकबोमवाडी भागातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. बरड येथून सकाळी या सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant dnyaneshwar maharaj