wari 2019 : माउलींच्या पादुकांना नीरास्नान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 July 2019

 टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला.

सोमेश्वरनगर - टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला. यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. तत्पूर्वी, पिंपरे खुर्द ग्रामस्थांची न्याहारी आणि नीरेकरांच्या दुपार भोजनाचा वारकऱ्यांनी आस्वाद घेतला. 

पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता वाल्हे गावचा निरोप घेऊन नऊ वाजता पिंपरे खुर्द येथील अहल्याबाई होळकर विहिरीशेजारी न्याहारीसाठी विसावला. सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. काही ठिकाणी फळे, चहा, पोहे वाटप करण्यात आले; तर काही ग्रामस्थांनी झुणका-भाकर व मिरचीच्या ठेच्याची सोय केली होती. विश्रांतीनंतर साडेअकरा वाजता सोहळा पाऊस झेलत नीरेत पोचला. सरपंच दिव्या पवार, उपसरपंच वर्षा जेधे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, राजेश चव्हाण, दीपक काकडे, वसंतराव दगडे, बाळासाहेब भोसले, दयानंद चव्हाण यांनी स्वागत केले. यानंतर वाजतगाजत सोहळा नीरा नदीकिनारी भोजनासाठी विसावला. तीस वर्षांच्या परंपरेप्रमाणे दत्ता चव्हाण यांनी पालखीप्रमुखांचा संपूर्ण पोशाख देऊन सत्कार केला.

या वेळी सातारा जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील हजर होते. नीरा ग्रामपंचायतीने फळे व पोहे वाटप केले. समता पतसंस्था यांनी बुंदी वाटप केले. नीरा मेडिकल असोसिएशनच्या वतीने सतीश गालिंदे मोफत औषध वाटप करीत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रानेही शेकडो लोकांवर मोफत उपचार केले. समर्थ पतसंस्था, मनोज शहा, बाळासाहेब ननावरे आदींनी भोजनव्यवस्था केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. दीड वाजता हा सोहळा नीरास्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून नगारखाना, अश्व, टाळकरी, झेंडेधारी, पताकाधारी अशा रचनेत सोहळा नदीत उतरला. राजाभाऊ आरफळकर आणि सोहळाप्रमुखांच्या हातात माउलींच्या पादुका देण्यात आल्या. "माउली माउली'च्या जयघोषात व टाळ-मृदंगांच्या गजरात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. यानंतर समता आश्रमशाळेच्या मुलांच्या वाद्य पथकाने पालखीचे सातारा जिल्ह्यात स्वागत केले. या प्रसंगी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पुरंदरचे सभापती रमेश जाधव, जिल्हा परिषदेचे प्रभाकर गावडे उपस्थित होते. नीरा नदीपात्रात पुरेसे पाणी वीर धरणातून सोडण्यात आले होते. तसेच, नीरा डावा व उजवा कालव्यातून जादा पाणी सोडले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Dnyaneshwar maharaj palkhi