wari 2019 : तुकोबांच्या पादुकांना टॅंकरच्या पाण्याने स्नान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 July 2019

नीरा नरसिंहपूर - नीरा नदी कोरडी असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी (ता. इंदापूर) येथे टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. महाआरती व पूजेनंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला.      

नीरा नरसिंहपूर - नीरा नदी कोरडी असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी (ता. इंदापूर) येथे टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. महाआरती व पूजेनंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला.      

सराटी येथे आज पहाटे चार वाजता काकडा आरती झाली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांची पूजा करण्यात आली. देहू संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे महाराज, पालखी सोहळाप्रमुख काशिनाथ मोरे, अजित मोरे, संजय मोरे, विश्वस्त संतोष मोरे, माणिक मोरे, विशाल मोरे, चैतन्य जगदाळे यांनी सकाळी सात वाजता परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीत टॅंकरच्या पाण्याने स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने महापूजा व आरती झाली. दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. 

प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलिस निरीक्षक मधुकर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, सरपंच रमेश कोकाटे, बंडू आवाड, सुरेश सोनवलकर, सुरेश जगदाळे, दिलीप डोले, सुजाता डोले आदींच्या उपस्थितीत पालखीला पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पालखी सकाळी आठ वाजता नीरा नदीवरील पुलावरून लाखो वारकऱ्यांच्या साथीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाली. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवादेवी मोहिते पाटील, किशोर सूळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील आदींनी तोफांच्या सलामीने पालखीचे स्वागत केले. 

पावसासाठी पांडुरंगाकडे धावा
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सलग दुसऱ्या वर्षी टॅंकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले असून, त्यांनी पावसासाठी पांडुरंगाकडे धावा केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram maharaj paduka bath with tanker water