wari 2019 : तुकोबांच्या पालखीचे निमगावात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 July 2019

हरीनामाचा जप करीत व टाळ-मृदंगांच्या गजरात सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करीत गुरुवारी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत मुक्कामी दाखल झाला.

निमगाव केतकी -  हरीनामाचा जप करीत व टाळ-मृदंगांच्या गजरात सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करीत गुरुवारी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत मुक्कामी दाखल झाला. पान उत्पादक शेतकऱ्यांनी मोफत विड्यांच्या पानांचे वाटप केले.

सवंदडीच्या माळावर भजनी मंडळी, सरपंच छाया मिसाळ, उपसभापती देवराज जाधव, नरसिंह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय चांदणे यांनी पालखीचे स्वागत केले. सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट, अष्टविनायक पतसंस्था व अष्टविनायक ग्रुप, सुवर्णयुग पतसंस्था, कै. पै. सोपानराव चॅरिटेबल ट्रस्ट, पै. के. के. पहिलवान ग्रुप यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. गुरुसेवा बचत गट, नरसिंह ज्येष्ठ नागरिक संघ, जनहित पतसंस्था, बालाजी पतसंस्था, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती, शिवसेना व केतकेश्‍वर डाळिंब संघटना, जय भवानी महिला पतसंस्था, नवी पेठ गणेश मंडळ, केतकेश्‍वर पतसंस्था यांच्या वतीने अल्पोपाहार व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. गावकरी मंडळीने बाजारतळावर वारकऱ्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. रेड स्वस्तिक पुणे, गणेश पतसंस्था, शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट, विश्‍व हिंदू परिषद यांनी वैद्यकीय सेवा पुरविली. ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, शेळगाव येथे पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. गोतोंडीत सायंकाळी साडेसहा वाजता उत्साहात स्वागत केले.

लासुर्ण्यात उखळी तोफांची सलामी 
वालचंदनगर  ः संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लासुर्णे गावच्या हद्दीमध्ये येताच उखळी तोफांची सलामी देऊन पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. लासुर्णे गावच्या हद्दीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा आल्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, हेमंत नरुटे यांनी स्वागत केले. चिखली फाट्यापासून लासुर्णे गावापर्यंत पालखी वाजतगाजत आणली.  जंक्‍शनमध्ये पालखीचे सरपंच राजकुमार भोसले, वसंत मोहोळकर, रामेश्‍वर माने, बाळासाहेब जठार, संजय शिंदे यांनी स्वागत केले. अंथुर्णेमध्ये सरपंच अरुणा बाळासाहेब म्हस्के, संजय वंचाळे, राहुल साबळे यांनी स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram maharaj palkhi in nimgaon ketki village