Wari 2019 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागले 26 तास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 July 2019

  "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे,' या भावनेने आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दहा लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत.

पंढरपूर -  "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे,' या भावनेने आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दहा लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजराने सारी पंढरी भक्तिमय झाली आहे. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपुढे रांझणी रस्त्यावर गेली असून, आज दर्शनासाठी 26 तास लागत होते. सायंकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसह सोबतचे लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले. 

आज पहाटे चार वाजल्यापासूनच चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. स्नानासाठी गर्दी झाली होती. चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन वारकरी गडबडीने आपली सुख-दुःखे ऐकणाऱ्या आपल्या जिवलगाला अर्थात राजस सुकुमाराला डोळे भरून पाहण्यासाठी दर्शनाच्या रांगेकडे जात होते. 

मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले नारायण रुस्तुमराव भालेराव (रा. नांदगाव खुर्द, ता. जि. परभणी) म्हणाले, की काल सकाळी सात वाजता गोपाळपूर रस्त्यावर दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. आज सकाळी नऊ वाजता दर्शन झाले. दर्शनाला 26 तास लागले. परंतु, विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर सगळा शीण निघून गेला आणि मन आनंदी झाले. आशा सुभाष लोखंडे (रा. पुणे) म्हणाल्या, की गेल्या पाच वर्षांपासून यात्रेला येत आहे. नदीवर स्नान केल्यानंतर वाळवंटात महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमची व्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty six hours for Vitthal Darshan