विठ्ठल मंदिर उद्यापासून 24 तास खुले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

एका तासाला किमान दोन हजार 400 भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. यात्राकाळात किमान सहा लाख भाविकांना विठ्ठल-रुक्‍मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता येईल.

पंढरपूर -  ""आषाढी यात्रेनिमित्ताने गुरुवारपासून (ता. 4) विठ्ठल मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने नियोजन केले आहे.

एका तासाला किमान दोन हजार 400 भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. यात्राकाळात किमान सहा लाख भाविकांना विठ्ठल-रुक्‍मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता येईल अशा पद्धतीने नियोजन केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

आषाढी वारीच्या निमित्ताने येथे मंगळवारी महास्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले पंढरपुरात आले होते. या मोहिमेत आठ टन कचरा गोळा केला. यात्रा काळात पंढरपुरात अधिकाधिक स्वच्छता राहील व यात्रेनंतरही स्वच्छता मोहीम राबवली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.दर्शनरांगेतील भाविकांच्या भावनांचा आणि त्यांच्या श्रद्धेचा आदर करीत मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना सन्मानाची व प्रेमाची वागणूक द्यावी, असे आवाहनही भोसले यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal Temple opened for 24 hours from tomorrow