Wari 2019 : भक्ती, शिस्त आणि शक्तीचे विद्यापीठ

सचिन शिंदे
मंगळवार, 9 जुलै 2019

वारीचा अनुभव सर्वांगसुंदर आहे. पालखी सोहळ्यातील रिंगणातून वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना ऊर्जा मिळते. त्यामुळे वारीतील शिस्त व आत्मिक समाधान अधिक महत्त्वाचे वाटते. ते कायम असल्याने सोहळ्यात माझ्यासारखे अनेक जण सहभागी आहेत. 
- साधना फडके, युवा वारकरी, कांडगाव (ता. दौंड)

बोरगाव - ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल एकल होते, त्याहून जास्त शिकता आले,’’ अशी प्रतिक्रिया युवा वारकरी साधना फडके हिने व्यक्त केली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज येथून सकाळी लवकर मार्गस्थ झाला. सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. एका रेषेत निघालेला सोहळा देखणा दिसत होता.

माळीनगर येथील पेट्रोल पंपावर येताच सोहळ्यातील पहिले उभ रिंगण पार पडले. सोहळ्यातील वारकरी दोन्ही बाजूने थांबले. त्यांच्यामधून वायुवेगाने अश्व धावले. अश्वाने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि रिंगण संपले. त्या वेळी उपस्थित वारकऱ्यांनी विविध खेळ केले. त्यात २२३ क्रमाकांच्या दिंडीतील साधना फडकेही त्या खेळात दंग होती. तिचा अनुभव वेगळाच होता. तिची ही पहिलीच वारी आहे. काका-काकूबरोबर ती आली आहे. वारी म्हणजे काय, याची तिला उत्सुकता होती. वारीत सहभागी झाल्यानंतरच ती पूर्ण झाली. 

रिंगणानंतर न्याहरीचा पहिला विश्राम माळीनगरातच झाला. त्या वेळी साधनाशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘‘मी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

वारीबद्दल प्रचंड उत्सुकता होती. वारीतील लोक कसे राहतात. त्यांचे व्यवस्थापन, त्यांची दैनंदिनी कशी चालते, याबाबतची उत्सुकात प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्यावरच पूर्ण झाली. वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल जितके काही ऐकले होते, त्याहून अधिक शिकता आले. आत्मिक ओढ व कोणत्याही प्रसंगाला न डगमगता सामोरे जाण्याचा गुण मनाला भावला आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari Ringan