esakal | Wari 2019 : माउलीं संगे... नाचू, गाऊ आनंदे
sakal

बोलून बातमी शोधा

Ravimaharaj-Madane

‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची.

Wari 2019 : माउलीं संगे... नाचू, गाऊ आनंदे

sakal_logo
By
विलास काटे

भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी क्रमांक ७८ मध्ये सुरेल गाताना मदने महाराजांची भेट झाली. ते म्हणाले, ‘‘पंढरीची वारी ही सुखाची अनुभूती आहे. यामध्ये कितीही चालले तरी थकवा जाणवत नाही. त्यातून केवळ आणि केवळ समाधानच मिळते. त्यामुळे दिवसभराची वाटचाल आनंददायी असते. अन्य वेळी राज्यभर कार्यक्रमांमधून अभंग गायन करणे आणि वारीतील दिंडीत गाणे यात खूप फरक आहे. तेथे अधिष्ठान असतेच असे नाही. वारीत चालताना मात्र विठुराया हेच अधिष्ठान असते, तसेच सोबत संतांची संगत असते. त्यामुळे दिंडीत चालताना गाण्याचा आनंद अधिक असतो.’’

बंधूभेटीने सोहळा गहिवरला
माउलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी वेळापूरकरांचा निरोप घेतला. ठाकूरबुवाच्या समाधी मंदिराजवळील शेतात भल्या सकाळी माऊलींच्या अश्वाने बेफाम धावून लाखो भाविकांची मने जिंकली. सायंकाळी टप्प्याजवळ माउलींच्या पालखीचा रथ थांबला. त्यापाठोपाठ सोपानदेवांचा पालखी रथ आला. बंधूभेटीचा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी टप्प्यावर गर्दी झाली होती. त्यानंतर पालखी भंडीशेगाव मुक्कामी विसावली. दरम्यान, उद्या बुधवारी वाखरी येथे सोहळ्यातील दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण होईल.