Wari 2019 : ‘वारीचा आनंद स्वर्गसुखाला लाजवेल असाच...’

विलास काटे
Thursday, 11 July 2019

वाखरीजवळ विश्वरूपदर्शन 
पालख्यांच्या गर्दीमुळे रस्ता गर्दीने ओसंडून वाहत होता. गर्दीतून वाट काढत माउलींची पालखी वाखरीतील माळरानात आली. भंडीशेगावमधील जेवण झाल्यानंतर पालखी दुपारी वाखरीकडे मार्गस्थ झाली. वाखरी येथे पंढरीच्या वारीचे विश्वरूप दर्शन घडले. उद्या पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी इसबावी येथे तिसरे उभे रिंगण होणार आहे.

वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली.

माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८ क्रमांकाच्या दिंडीत पंढरीची वाट चालतो आहे. रिंगणाचा मनमुराद आनंद घेताना हर्षद भेटला. तो म्हणाला, ‘‘पंढरीच्या वारीत आनंद मिळतो, असे सर्वच म्हणतात; पण खरा आनंद नुसते पायी चालून नाही मिळत. दिंड्यांमध्ये सुरू असलेले अभंग गाण्यात आनंद आहे. मनमुराद नाचण्यात आनंद आहे. चिंब भिजण्यात आनंद आहे आणि चिखलात लोळतानाही आनंद आहे. म्हणूनच संतांनी ही वाट परमानंदाची म्हटली आहे.

खूपदा असे वाटते, की स्वर्ग म्हणजे नेमके काय. पण मला असे वाटते, सध्याच्या काळात वारीच्या वाटेने मनमुराद आनंद घेणे यापेक्षा स्वर्गसुखाचा आनंद दुसरा कोणता असणार.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari Sant Dnyaneshwar Maharaj