Wari 2019 : विठूरायाच्या पदस्पर्शासाठी 50 हजार भाविक रांगेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 13 लाख भाविकांनी हजेरी लावत विठूरायाचे आणि मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेले लाखो भाविक आजही दर्शनासाठी पंढरीत ठाण मांडून आहेत.

सुमारे 13 लाख भाविकांनी घेतले कळसदर्शन; रांग अजूनही गोपाळपूरपर्यंत
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 13 लाख भाविकांनी हजेरी लावत विठूरायाचे आणि मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेले लाखो भाविक आजही दर्शनासाठी पंढरीत ठाण मांडून आहेत.

आज त्रयोदशीला देखील (रविवारी) विठूरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग दहा पत्राशेड भरून पुढे गोपाळपूरपर्यंत गेली होती. विठूरायाच्या भेटीसाठी आजही हजारो भाविक पंढरीत मुक्कामी आहेत.

यात्रेपूर्वीच अनेक भाविक विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. एकादशीच्या दिवशी तर दर्शनरांग मंदिरापासून पाच किलोमीटरपर्यंत गेली होती. दशमी आणि एकादशी या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी विठूरायाचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतले.

आषाढी एकादशी दिवशी पंढरीत भक्तीचा महापूर आला होता. अलोट गर्दीमुळे अनेकांना दर्शन घेता आले नाही. एकादशीनंतर आता भक्तांचा महापूर ओसरू लागला आहे.

पौर्णिमेच्या गोपाळकाल्याने आषाढीची सांगता होते. पौर्णिमेपर्यंत विठ्ठलदर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम राहील.
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Vittal Darshan Line Pandharpur Aashadhi Ekadashi