esakal | आषाढी वारीत पंढरपुरात दुचाकीवरील आरोग्यदूत 
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारीत पंढरपुरात दुचाकीवरील आरोग्यदूत 

आषाढी वारीत पंढरपुरात दुचाकीवरील आरोग्यदूत 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आषाढी वारीच्या काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून, 30 दुचाकींच्या सहायाने आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सांगितले. 

मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. बी.डी. पवार आदी उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, ""पंढरपूर शहरात 30 जून ते 9 जुलै या काळात आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रिस्तरीय पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्याचे नियोजन केले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसरात येथे अतिदक्षता कक्ष सुरू केले आहेत. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. आरोग्य विभागाचे 100 खाटांचे आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर 50 खाटांचे संसर्गजन्य रुग्णालयही आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 18 धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून पंढरपूर येथे वारी काळात 24 तास आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. संपूर्ण पालखी मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील (क्रमांक 108) 75 रुग्णवाहिका आहेत. दोन मुख्य पालखींसोबत 108 व 102 क्रमांक सेवेतील 12 रुग्णवाहिकादेखील आहेत.'' 

आरोग्यदूत पंढरपूरमधील पाणी शुद्धीकरण तपासणीबरोबरच आरोग्य केंद्रांची माहितीदेखील नागरिकांना देतील. त्याचबरोबर रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी आहेत, याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच गरज भासल्यास दुचाकीवरून रुग्णाला जवळच्या दवाखान्यातदेखील उपचारासाठी नेतील. फक्त पंढरपूर शहरातच 102 व 104 क्रमांक सेवेतील 14 रुग्णवाहिका ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका प्रसंगी बाह्य उपचार केंद्र म्हणूनही या काळात कार्यरत राहतील. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संपर्क कक्ष (02186-225101/225103) तसेच शहरात आठ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

वारी काळातील सेवा 

- नियंत्रण कक्षामुळे रुग्णवाहिका पाठविणे सुलभ 
- पालखी मार्गावरील जलस्रोतांची तपासणी व क्‍लोरिनेशन 
- टॅंकरमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी जागा निश्‍चित 
-पालखी मुक्कामी डास प्रतिबंधक फवारणी 
- तत्पर सेवोसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज