esakal | wari 2019 : विठुरायाच्या नामघोषात  वारकरी पंढरीत दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

wari 2019 : विठुरायाच्या नामघोषात  वारकरी पंढरीत दाखल 

wari 2019 : विठुरायाच्या नामघोषात  वारकरी पंढरीत दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - आषाढी वारीच्या महासोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मजल दरमजल करत विठुनामाच्या गजरात पंढरीकडे येऊ लागले आहेत. आषाढी वारीचा मुख्य सोहळा 12 जुलै रोजी आहे. वारी काळात अधिकाधिक भाविकांना विठ्ठल-रुक्‍मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता यावे यासाठी गुरुवारपासून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. 

मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज सकाळी विठ्ठलाची पूजा करून पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाला मखमली गादीचा लोड देण्यात आला. प्रक्षाळ पूजेपर्यंत देव आपल्या भक्तांना दर्शनासाठी 24 उभा असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. यात्रा काळात देवाची सकाळी नित्यपूजा केली जात आहे. दुपारी नैवद्य आणि सायंकाळी लिंबूपाणी देण्यात येते. यात्रा काळात देवाचे नित्योपचार, यजमान पूजा आणि पोशाख बंद राहतात. दर्शन रांगेचे योग्य नियोजन केल्यामुळे प्रतितास 2 हजार 400 याप्रमाणे दिवसात 45 ते 48 हजार भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ होईल, अशी माहिती ढोले यांनी दिली. 

पालखीच्या स्वागतासाठी तयारी 
संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. 6) सकाळी होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असून, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, नूतन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी जिल्हा सरहद्दीवर उपस्थित राहणार आहेत. 

धर्मपुरी येथे जिल्हा सरहद्दीवर माउलींच्या स्वागतानंतर पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहावर दुपारच्या विसाव्यासाठी माउलींचा सोहळा थांबतो. जिल्हा सरहद्द ते विसावा हे सुमारे तीन कि.मी. अंतर हे मान्यवर माउलींसोबत चालत येतात. या ठिकाणी आळंदी देवस्थानतर्फे सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना निरोप व सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे स्वागत होते. पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम शनिवारी (ता. 6) नातेपुते येथे असून, रविवारी (ता. 7) पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे होणार आहे. 

प्रशासनाची तयारी 
- स्वच्छ, निर्मल आणि सुंदर वारीसाठी प्रयत्न 
- सुमारे 29 हजार स्वच्छतागृहे 
- एक हजार 600 स्वच्छतादूत 
- खासगी स्वच्छतागृहांचाही वापर