सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 26 हजार वीजग्राहकांनी केला 28 कोटींचा भरणा 

प्रमोद बोडके
Wednesday, 8 July 2020

गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब 
घरगुती वीजग्राहकांनी जूनमध्ये एकत्रित आलेल्या तीन ते चार महिन्यांच्या वीजबिलाबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. वीजबिलाच्या पडताळणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. एकाही पैशाचा अतिरिक्त भुर्दंड वीजग्राहकांवर जूनच्या बिलामध्ये लावण्यात आलेला नाही. ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रीडिंग घेतल्यानंतर अचूक वीजवापराचे बिल तयार करण्यात आले आहे व बिलामध्ये स्लॅब बेनिफीट व स्लॅबनुसार दर आकारणी करण्यात आली आहे. बारामती मंडल अंतर्गत सर्वच वीजबिल भरणा केंद्र सुरू झाले आहेत. तथापि, ग्राहकांना घरबसल्या देखील वीजबिल भरणा करण्यासाठी "ऑनलाइन'ची सोय उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी 'ऑनलाइन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. तसेच "ऑनलाइन' बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

सोलापूर : मीटर रीडिंग सुरू झाल्यामुळे लॉकडाऊनच्या महिन्यांमधील अचूक वीजवापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत वीजग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम वेगाने दूर होत आहे. त्यामुळे महिन्याभरात मंगळवार (दि. 7)पर्यंत सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 800 वीजग्राहकांनी 28 कोटी 3 लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महावितरणकडून मीटर रीडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. काही ग्राहकांकडे दि. 23 मार्चनंतर मीटर रीडिंग होऊ शकले नाही. त्यांना मार्चसह एप्रिल व मे महिन्याचे बिल सरासरीने देण्यात आले आहे. त्यानंतर दि. 1 जूनपासून मीटर रीडिंग सुरू करण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या या दोन-तीन महिन्यांमध्ये वीजग्राहकांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापराचे अचूक मीटर रीडिंग उपलब्ध झाले व त्याचे समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. 

मात्र जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडींगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्‌स ऍप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम युद्धपातळीवर सुरू केले. यासोबतच वीजक्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील वीजबिलांची आकारणी नियमानुसार व योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे वीजग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा वेगाने सुरू झाला आहे.

गेल्या महिन्याभरात अकलूज विभागात 13750 ग्राहकांनी 3 कोटी 70 लाख, बार्शी विभागात 27 हजार 980 ग्राहकांनी 6 कोटी 93 लाख, पंढरपूर विभागात 19 हजार 800 ग्राहकांनी 3 कोटी 73 लाख, सोलापूर ग्रामीण विभागात 20 हजार 200 ग्राहकांनी 4 कोटी 25 लाख आणि सोलापूर शहर विभागात 45 हजार 100 ग्राहकांनी 9 कोटी 42 लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 lakh 26 thousand consumers paid Rs 28 crore in Solapur district