सोलापूर शहरात दरवर्षी ‘पोक्सो’चे १०० गुन्हे! प्रॉपर्टी, पूर्ववैमनस्यातूनही फिर्यादी; दीड वर्षांत ९४ 'अल्पवयीन'वर अत्याचार, ‘पोक्सो’चा गुन्हा कधी होतो? वाचा...

अल्पवयीन मुलामुलींवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील कायदा केंद्र सरकारने २०१२ मध्ये अधिक कठोर केला. ‘पोक्सो’अंतर्गत पीडितेची तक्रार तत्काळ दाखल करून घेणे पोलिसांना बंधनकारक असून संशयित आरोपीला अटक करावीच लागते. सोलापूर शहरात मागील वर्षी ‘पोक्सो’अंतर्गत १२९, तर चालू वर्षात जूनअखेर ७५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकमेकांविरोधातील भांडणाचा राग, प्रॉपर्टीचे वाद आणि अन्य कारणांमुळेही काही गुन्हे दाखल झाले आहेत.
POCSO Case
POCSO Casesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन मुलामुलींवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील कायदा केंद्र सरकारने २०१२ मध्ये अधिक कठोर केला. ‘पोक्सो’अंतर्गत पीडितेची तक्रार तत्काळ दाखल करून घेणे पोलिसांना बंधनकारक असून संशयित आरोपीला अटक करावीच लागते. सोलापूर शहरात मागील वर्षी ‘पोक्सो’अंतर्गत १२९, तर चालू वर्षात जूनअखेर ७५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकमेकांविरोधातील भांडणाचा राग, प्रॉपर्टीचे वाद आणि अन्य कारणांमुळेही काही गुन्हे दाखल झाले आहेत.

सोलापूर शहरात मागील वर्षी बलात्काराचे ८३ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५३ पीडित मुली अल्पवयीन आहेत. तर विनयभंगाच्या १७७ गुन्ह्यांमध्ये ७६ अल्पवयीन मुली पीडित आहेत. दुसरीकडे चालू वर्षात (जानेवारी ते जून २०२६) बलात्काराच्या ५३ गुन्ह्यांमध्ये ४१, तर विनयभंगाच्या ६७ गुन्ह्यांमध्ये ३४ पीडित मुली अल्पवयीन आहेत.

दरम्यान, बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २०१२ मध्ये हा कायदा अंमलात आणला. या कायद्यानुसार किमान शिक्षा १० वर्षांची आहे. बालक १६ वर्षांखालील असल्यास किमान शिक्षा २० वर्षांची असून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात देहदंड अथवा फाशीच्या शिक्षेचीही तरतूद आहे. यापूर्वी सात वर्षे असलेली शिक्षा वाढवून २० वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितांना टप्प्याटप्प्याने ‘मनोधैर्य’ योजनेतून मदतही दिली जाते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

‘पोक्सो’चा गुन्हा कधी दाखल होतो?

‘बीएनएस’मधील कलम ७३, ७५ व ७९ अंतर्गत अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचार करणाऱ्यांविरोधात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल होतो. यात अत्याचार करणे, फूस लावून पळवून नेणे, पाठलाग करणे, सतत एकटक पाहणे, ज्यातून अल्पवयीनांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणे, अश्लील संदेश पाठविणे, जाणीवपूर्वक हावभाव करणे तसेच अश्लील फोटो किंवा व्हिडिओ दाखविणे अथवा त्यांच्यासमोर पाहणे, अशा बाबींचा समावेश आहे. सोलापूर शहर पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांमध्ये अश्लील हावभाव करणे, लज्जा वाटेल असे वर्तन करणे, फूस लावून पळवून नेणे तसेच अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची प्रकरणे अधिक आहेत. काही प्रकरणांत पोलिस संशयितास ‘बीएनएस’मधील कलम ३५ (३) नुसार अटक न करताही अधिक सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू शकतात.

थेट करावी पोलिसांत तक्रार

अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या पालकांचा जबाब त्वरित न्यायाधीशांसमोर नोंदविला जातो. ‘पोक्सो’अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधितांवरच कारवाई होऊ शकते. हे खटले विशेष न्यायालयात ‘फास्ट ट्रॅक’वर चालविले जात असल्याने पीडितेला जलद न्याय मिळू लागला असून वाईट प्रवृत्तीला लगाम बसला आहे. कोणत्याही अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार किंवा छेडछाड झाल्यास त्यांनी न घाबरता थेट डायल ‘११२’ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

- डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त, सोलापूर

सोलापूर शहरातील स्थिती

  • वर्ष ‘अल्पवयीन’वरील अत्याचार ‘अल्पवयीन’चा विनयभंग

  • २०२५ ५३ ७६

  • २०२६ ४१ ३४

  • एकूण ९४ ११३

पोलिसांचे प्रसंगावधान अन्‌ बलात्काराचा गुन्हा थांबला

एका महिलेने रात्री वॉकिंगला गेल्यावर तिघांनी बलात्कार केला, अशी तक्रार विजापूर नाका पोलिसांत केली होती. पण, पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांचे मार्गदर्शन आणि विजापूर नाका पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्या तक्रारीची शहानिशा झाली. त्यावेळी त्या महिलेने तिच्या प्रियकराला वाचविण्यासाठी हा बनाव केल्याची बाब उघड झाली. त्यामुळे त्या निरापराध मुलांवर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com