दहावी- बारावी परीक्षेसाठी भरारी पथक प्रत्येक तालुक्यात! तिघांचे बैठे पथक ३ तास केंद्रांवरच बसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam
दहावी- बारावी परीक्षेसाठी भरारी पथक प्रत्येक तालुक्यात! तिघांचे बैठे पथक ३ तास केंद्रांवरच बसणार

दहावी- बारावी परीक्षेसाठी भरारी पथक प्रत्येक तालुक्यात! तिघांचे बैठे पथक ३ तास केंद्रांवरच बसणार

सोलापूर : दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक आणि जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असणार आहेत. दुसरीकडे तीन जणांचे बैठे पथक तीन तास पेपर सुटेपर्यंत परीक्षा केंद्रावरच ठाण मांडून असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चपर्यंत होणार आहे. परीक्षा केंद्रांबाहेर व परीक्षा हॉलमध्ये परीक्षेदम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी यंदा प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीची मदत घेतली जाणार आहे.

दक्षता समितीत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व योजनेचे शिक्षणाधिकारी असतात. दक्षता समितीच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भरारी पथके तालुकानिहाय परीक्षा केंद्रांना भेटी देतील.

चार जणांच्या त्या भरारी पथकात वर्ग- एक, दोन, तीनचे अधिकारी, कर्मचारी व एक महिला प्रतिनिधी असणार आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांकडे प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे देताना व परीक्षा हॉलमध्ये ते उघडतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या कोणत्याही चुकीच्या हालचाली किंवा कृतीचा व्हिडिओ काढून केंद्र संचालक व बोर्डाला पाठविण्याची जबाबदारी परिपर्यवेक्षक (रनर) यांच्याकडे असणार आहे. पुणे बोर्डाने पहिल्यांदाच कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस पाऊल उचलले आहे.

परीक्षा केंद्रांवर तीन जणांचे बैठे पथक

परीक्षेच्या काळात पेपर सुटेपर्यंत त्या केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी बैठे पथक त्याठिकाणी नेमले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्राथमिक शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील बैठे पथकात किमान तीन सदस्य असतील. पेपरचा संपूर्ण वेळ होईपर्यंत ते पथक त्याचठिकाणी वॉच ठेवेल. गैरप्रकार करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

एकाच वर्गात पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना पकडल्यास संबंधित पर्यवेक्षकाला जबाबदार धरून केंद्रसंचालक त्या पर्यवेक्षकावर कायदेशीर कारवाई करतील. जिल्ह्यातील जवळपास २०० परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात असणार आहे. बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यात ११४ तर दहावीसाठी १७६ परीक्षा केंद्रे असणार आहेत. परीक्षेसाठी स्वतंत्रपणे १७ परिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

परीक्षेसंबंधी सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • बारावीचे परीक्षार्थी

  • ५३,५८४

  • विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे

  • ११४

  • दहावीचे परीक्षार्थी

  • ६४,४२४

  • दहावीसाठी परीक्षा केंद्रे

  • १७६