राज्यात 12 हजार रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

लातूर - नवीन तंत्रज्ञानामुळे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार करणे सहज सोपे झाले आहे. यातून अनेकांना जीवदानही मिळू लागले आहे; पण समाजात अवयवदान करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्याचा परिणाम राज्यात 12 हजारांवर रुग्ण वेगवेगळ्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. या रुग्णांना अवयव मिळावेत, त्यांचे पुढचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राज्यात महाअवयवदान अभियान राबविले जाणार आहे. यात जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एकाचे हृदय काढून दुसऱ्याला बसवून त्याला जीवदान देण्याची यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. अवयवदानाअंतर्गत मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण करण्यात येत आहे. तसेच कॅडेव्हर, मस्तिष्क स्तंभ मृत पश्‍चात मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, हृदय, त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात; पण हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. आज राज्यात विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत 12 हजारांवर अधिक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अवयवच मिळत नसल्याने त्यांच्यावर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाही करता येत नाहीत. 

जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी याकरिता जनजागरणासाठी महाअवयवदान अभियान 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक अवयवदात्यांना 15 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीन हजार अवयव नोंदणी कार्यक्रम निमंत्रणे व तालुक्‍याच्या ठिकाणी एक हजार अवयव नोंदणी कार्यक्रम निमंत्रणे घरोघर जाऊन वाटून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. 30 ऑगस्टला जिल्हा व तालुकास्तरावर अवयवदान जागृती महारॅली काढण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला व निबंध स्पर्धा होणार आहेत. तर एक सप्टेंबरला अवयवदान अभियान नोंदणी शिबिराचे उद्‌घाटन कार्यक्रम, तसेच नोंदणी केलेल्या अवयवदात्यांचा सन्मान केला जाणार आहे. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव करण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांनाही विचारणा 

शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण होते. अवयवदान कार्यक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांत जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये मृत्युपश्‍चात अवयवदान करण्यास तयार आहेत किंवा नाही, याची विचारणा करण्यात येणार आहे. 

Web Title: 12 thousand patients waiting for organs of state