esakal | मौल्यवान सांस्कृतिक ठेव्याचे जतन; 129 पुस्तकांचे डिजिटायझेशन
sakal

बोलून बातमी शोधा

मौल्यवान सांस्कृतिक ठेव्याचे जतन; 129 पुस्तकांचे डिजिटायझेशन

राज्य मराठी विकास संस्थेने दुर्मीळ ग्रंथ व नियतकालिकांचे डिजिटायझेशन केले आहे. आतापर्यंत 129 पुस्तके व 555 नियतकालिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे नवे संकेतस्थळ विकसित केले जात असून, हा मौल्यवान ठेवा लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होईल. 

मौल्यवान सांस्कृतिक ठेव्याचे जतन; 129 पुस्तकांचे डिजिटायझेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेने दुर्मीळ ग्रंथ व नियतकालिकांचे डिजिटायझेशन केले आहे. आतापर्यंत 129 पुस्तके व 555 नियतकालिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे नवे संकेतस्थळ विकसित केले जात असून, हा मौल्यवान ठेवा लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होईल. 

स्वामित्व हक्काची मुदत संपलेले दुर्मीळ मराठी ग्रंथ आणि नियतकालिकांचे डिजिटायझेशन करून ते इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचना राज्याच्या सांस्कृतिक धोरणात करण्यात आली आहे. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि समाजजीवन या संदर्भातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने दुर्मीळ पुस्तके आणि नियतकालिकांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प संस्था राबवत आहे. 2017 च्या अखेरपर्यंत 256 पुस्तके व नियतकालिकांचे डिजिटायझेशन झाले होते. आता 129 पुस्तके आणि 555 नियतकालिके पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

ही दुर्मीळ पुस्तके विविध संस्था, विद्यापीठ, वाचनालये यांच्याकडून मिळाली. मुंबई विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय, भारत इतिहास संशोधन मंडळ आदी 15 ते 20 संस्थांनी त्यासाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे 1824 पासूनची पुस्तके या संग्रहात आहेत. नवीन नियतकालिकांतील महत्त्वाचे लेख डिजिटाइझ करण्याचे काम सुरू आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे नवीन संकेतस्थळ तयार केले जात असून, तेथे ही सर्व पुस्तके व नियतकालिके वाचकांना पाहता व मोफत डाउनलोड करता येतील, अशी माहिती संचालक आनंद काटीकर यांनी दिली. 

खजिना खुला 

महिकावतीची बखर, संगीत उःशाप नाटक, 1857 ची मराठी-इंग्रजी डिक्‍शनरी, संगीत मेनका, लोकमान्य टिळकांचे "केसरी'तील लेख, न. चिं. केळकरांची सहा नाटके, "निबंधमाला', "ज्ञानोदय' आदी नियतकालिके असा खजिनाच वाचकांसाठी खुला झाला आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी http://rmvs.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. 

loading image