

solapur accident
तात्या लांडगे
सोलापूर : घरातून कामानिमित्त बाहेर पडलेले १३५० जण पुन्हा कधी घरी आलेच नाहीत. मागील दोन वर्षांत त्यांचा रस्ते अपघातात अचानक मृत्यू झाला. सोलापूर शहराच्या हद्दीत आणि ग्रामीणमधील अकलूज, पांगरी, वैराग, मंगळवेढा, अक्कलकोट दक्षिण व अक्कलकोट उत्तर, टेंभुर्णी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त अपघात व अपघाती मृत्यू झाले आहेत.
दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत रस्त्यावरील वाहतूक वाढलेली असते. या वेळेत मद्यपी, मोबाईल टॉकिंग, विरुद्ध दिशेने ये-जा करणारे, अतिवेगाने वाहन चालविणारे, बंद पडलेल्या रस्त्यावरील वाहनांना मागून धडकणारे, कानात हेडफोन घालून मॉर्निंग वॉक करणारे आणि रस्ता ओलांडणाऱ्यांचा सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. अपघाती मृत्यूमध्ये ५६ टक्के दुचाकीस्वार असून, त्यातील बहुतेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. दुसरीकडे, अपघाती मृतांमध्ये २४ टक्के पादचारी आहेत.
विशेष बाब म्हणजे, सर्वाधिक अपघात ऊस गाळप हंगामात (नोव्हेंबर ते जानेवारी) आणि मे व जून महिन्यात (शाळांना व शासकीय सुट्ट्या अधिक असतात) झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, याची वाट न पाहता स्वत:हून वाहतूक नियम पाळल्यास अपघात होणार नाही. आपल्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाचे भविष्य काय राहील, याचा विचार प्रत्येकाने केल्यास निश्चितपणे अपघात होणार नाहीत, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची दोन वर्षांतील स्थिती
नोव्हेंबर २०२४ पर्यंत
एकूण अपघात
१,२७३
गंभीर अपघात
६३३
अपघाती मृत्यू
६८३
-------------------------------------------
नोव्हेंबर २०२५ पर्यंतची स्थिती
एकूण अपघात
१,३१६
गंभीर अपघात
६४७
अपघाती मृत्यू
६६७
‘या’ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक प्रमाण
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणमधील अकलूज, पांगरी, वैराग, मंगळवेढा, अक्कलकोट दक्षिण व अक्कलकोट उत्तर, टेंभुर्णी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २०२४ च्या प्रमाणात चालू वर्षात अपघातातील मृत्यू वाढले आहेत. हे प्रमाण किमान १० टक्के ते कमाल ७७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. याशिवाय सोलापूर शहराच्या हद्दीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरपर्यंत १५ अपघाती मृत्यू वाढल्याची नोंद वाहतूक शाखेकडे झाली आहे.
गावकऱ्यांनी, कुटुंबियांच्या प्रबोधनाची खूप मोठी गरज
यावर्षी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर तीन कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दंड करण्यापेक्षा कोणाचा अपघात व अपघाती मृत्यू होऊ नये, हा कारवाईचा हेतू असतो. तरीपण, अनेकजण नियम पाळत नाहीत. तीन- चारवेळा दंड होऊनही ते वाहतूक नियम पाळत नाहीत. यावर आता ग्रामस्थ व पालकांनीच जनजागृती करून पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघात व अपघाती मृत्यू होणार नाहीत.
- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.